पुणे: देशातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) केंद्र असलेल्या महानगरांमध्ये मागील काही काळात घरांची मागणी वाढली आहे. यामुळे घरांच्या किमतीही वाढू लागल्या आहेत. देशातील सात महानगरांमध्ये घरांच्या किमतीत मागील तीन वर्षांत ३३ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यात पुण्यातील माहिती तंत्रज्ञान केंद्र असलेल्या हिंजवडी आणि वाघोली भागात घरांच्या किमतीत अनुक्रमे २२ आणि २५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.
अनारॉक ग्रुपने मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. त्यात ऑक्टोबर २०२० ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीचा मालमत्ता क्षेत्राचा आढावा घेण्यात आला आहे. यामध्ये मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, कोलकता या महानगरांचा समावेश आहे. या अहवालानुसार, देशभरात हैदराबादमधील गच्चीबावली भागात घरांच्या किमती सर्वाधिक ३३ टक्क्याने वाढल्या आहेत. त्याखालोखाल हैदराबादमधीलच कोंडापूर भागात किमती ३१ टक्क्याने वाढल्या आहेत. गच्चीबावली भागात घरांची सरासरी किमत यंदा ऑक्टोबरमध्ये प्रति चौरसफूट ६ हजार ३५५ रुपयांपर्यंत पोहोचली. ही किंमत ऑक्टोबर २०२० मध्ये प्रति चौरसफूट ४ हजार ७९० होती.
हेही वाचा… पुणे पोलीस शोधताहेत कपिल शर्माला?
बंगळुरूमधील व्हाईटफिल्ड भागात घरांच्या किमती तीन वर्षांत प्रति चौरसफूट ४ हजार ९०० रुपयांवरून ६ हजार ३२५ रुपयांवर पोहोचल्या आहेत. मुंबई आणि दिल्लीतील मुख्य भागातील घरांच्या किमती तीन वर्षांत सरासरी १३ ते २७ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यात दिल्लीत ग्रेटर नोएडा भागात २७ टक्के आणि मुंबईत लोअर परळ भागात २१ टक्क्यांनी किमती वाढल्या आहेत.
यंदा घरांची उच्चांकी विक्री
यंदा ऑक्टोबर अखेरीस सणासुदीची घरांची खरेदी संपली आहे. त्यामुळे या वर्षातील घरांच्या सर्वाधिक विक्रीचा काळही ओसरला आहे. देशभरातील सातही महानगरांमध्ये यंदा घरांना मागणी जास्त दिसून आली. याचबरोबर घरांच्या विक्रीतही मोठी वाढ नोंदविण्यात आली. घरांच्या विक्रीने यंदा २०१४ नंतरची उच्चांकी पातळी गाठली, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
देशातील प्रमुख सात महानगरांपैकी माहिती तंत्रज्ञान केंद्र असलेल्या हैदराबाद, बंगळुरू आणि पुण्यात घरांच्या सरासरी किमतीत जास्त वाढ झालेली दिसून आली आहे. करोनापूर्व काळाचा विचार करता हैदराबादमध्ये सर्वाधिक वाढ झालेली आहे. – प्रशांत ठाकूर, विभागीय संचालक, अनारॉक ग्रुप