पुणे : देशातील प्रमुख सात महानगरांत गेल्या दोन आर्थिक वर्षांत घरांच्या किमतीत सर्वाधिक सुमारे १३ टक्क्यांची वार्षिक वाढ झाली आहे. गेल्या दोन आर्थिक वर्षांत ८ लाख २५ हजार नवीन घरांचा पुरवठा झाला असून, ८ लाख ७२ हजार घरांची विक्री झाली आहे. महागाई दरात घट होत असताना घरांच्या किमतीत मात्र वाढ नोंदविण्यात आली आहे.
अनारॉक ग्रुपने देशातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार, देशातील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर घरांच्या किमतीत वार्षिक ६ टक्के वाढ नोंदविण्यात आली. गेल्या दोन आर्थिक वर्षात ही वाढ १३ टक्क्यांवर पोहोचली. देशातील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर घरांची सरासरी किंमत प्रति चौरसफूट ५ हजार ५९९ रुपये होती. गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस ही किंमत प्रति चौरसफूट ७ हजार ५५० चौरस फुटांवर पोहोचली आहे. देशात २०१९ च्या आधी घरांच्या किमतीतील वार्षिक वाढ केवळ १ टक्का होती. गेल्या दशकभरात मागणीपेक्षा घरांचा पुरवठा अधिक झाला आहे. देशातील सात महानगरांत २०१३-२०२० या सात वर्षांत २३ लाख ५५ हजार नवीन घरांचा पुरवठा झाला तर २० लाख ६८ हजार घरांची विक्री झाली.
हेही वाचा…पुणेकर हवाई प्रवाशांचे आणखी महिनाभर हाल? खुद्द मंत्री मोहोळ यांनीच दिली कबुली
लोकसंख्येत सुरू असलेली वाढ, वाढते नागरीकरण यामुळे घरांची मागणी वाढत आहे. मोठ्या संख्येने लोक शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत. त्यातून घरांच्या मागणीत वाढ होऊन किमतीतही वाढ होताना दिसत आहे. घरभाड्यातही वाढ होत आहे. घरांच्या किमतीत २०१३ पासून सातत्याने वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या दोन आर्थिक वर्षात मात्र घरांच्या किमतीत १३ टक्के वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात किरकोळ महागाई दरात १.४ टक्के घट होऊन तो ५.४ टक्के नोंदविण्यात आला. महागाई दरात घट होत असताना घरांच्या किमतीतील वाढ कायम आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा…शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा एल्गार; फुलेवाडा ते विधानभवन मार्गावर पायी फेरी
घरांच्या सरासरी किमती (प्रति चौरस फूट)
-२०१९-२० : ५,५९९ रुपये
-२०२०-२१ : ५,६६० रुपये
-२०२१-२२ : ५,८८१ रुपये
-२०२२-२३ : ६,३२५ रुपये
-२०२३-२४ : ७,५५० रुपये