पुणे : देशातील घरांच्या सरासरी किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. यावर्षी तिसऱ्या तिमाहीत घरांच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. घरांच्या किमतीत सलग १५ व्या तिमाहीत वाढ नोंदविण्यात आली असून, सर्वाधिक वाढ दिल्लीत तर सर्वांत कमी वाढ चेन्नईमध्ये झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रेडाई आणि कॉलियर्स इंडियाने देशातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार, यावर्षी तिसऱ्या तिमाहीत देशातील प्रमुख आठ शहरांत घरांची सरासरी किंमत प्रतिचौरस फूट ११ हजार रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षातील याच तिमाहीच्या तुलनेत त्यात ११ टक्के वाढ झाली आहे. घरांच्या किमतीत सर्वाधिक वाढ दिल्लीत नोंदविण्यात आली आहे. दिल्लीत घरांची सरासरी किंमत ११ हजार ४३८ रुपये झाली असून, त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३२ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. त्याखालोखाल बंगळुरूमध्ये २४ टक्के वाढीसह घरांची किंमत ११ हजार ७४३ रुपयांवर गेली आहे. अहमदाबादमध्ये १६ टक्के वाढीसह घरांची किंमत ७ हजार ६४० रुपये, पुण्यात १० टक्के वाढीसह किंमत ९ हजार ८९० रुपये, मुंबईत ४ टक्के वाढीसह किंमत २० हजार ४३८ रुपये, हैदराबाद आणि कोलकत्यात प्रत्येकी ३ टक्के वाढीसह किंमत अनुक्रमे ११ हजार ३५१ रुपये व ७ हजार ६१६ रुपये आणि चेन्नई २ टक्के वाढीसह किंमत ७ हजार ८८९ रुपये आहे.

हेही वाचा – एकच नाळ असलले जुळे गर्भ… एकाची वाढ खंडित… अखेर डॉक्टरांनी घेतला बायपोलर कॉर्ड ऑक्लुजनचा निर्णय

याबाबत क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष बोमन इराणी म्हणाले की, ग्राहकांमध्ये घर खरेदीबाबत सकारात्मकता असून, घरांची किमतीतील वाढ याचे निदर्शक आहे. गृहनिर्माण क्षेत्रात वातावरण सध्या चांगले आहे. मोठ्या घरांना ग्राहकांकडून पसंती दिली जात आहे, यामुळे घरांच्या किमतीत वाढ झालेली दिसून येत आहे. ग्राहकांकडून मोठ्या घरांना मागणी असल्याने आगामी काळात किमतीतील वाढ कायम राहील. आगामी काळात रिझर्व्ह बँकेकडून व्याज दर कपातीची शक्यता असल्याने घरांना मागणी आणखी वाढेल.

याबाबत कॉलियर्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बादल याज्ञिक म्हणाले की, गृहनिर्माण बाजारपेठ हळूहळू स्थिरावत आहे. यामुळे हे गृहनिर्माण क्षेत्राबाबत सकारात्मक वातावरण आहे. विकसक आता छोट्या आकाराच्या आणि कमी किमतीच्या घरांकडे वळू लागले आहेत. घरांच्या सरासरी किमतीत वाढ होत असली तरी रिझर्व्ह बँकेकडून व्याज दरात कपात झाल्यास ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा – पुणे : पत्नीकडून एकाला लाटण्याने बेदम मारहाण, करंगळीचा चावा घेऊन दुखापत; पत्नीविरुद्ध गुन्हा

घरांची सरासरी प्रतिचौरस फूट किंमत

शहर – तिसऱ्या तिमाहीतील किंमत (रुपयात) – गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ (टक्क्यांत)

मुंबई – २०,४३८ – ४

पुणे – ९,८९० – १०

अहमदाबाद – ७,६४० – १६

बंगळुरू – ११,७४३ – २४

चेन्नई – ७,८८९ – ०२

दिल्ली – ११,४३८ – ३२

हैदराबाद – ११,३५१ – ३

कोलकता – ७,६१६ – ३

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: House prices will continue to rise credai colliers report reveals the exact reason pune print news stj 05 ssb