पुणे : सोसायटीच्या नावाने सुरू केलेल्या समाजमाध्यमातील समुहातून काढून टाकल्याने एकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर भागातील एका सोसायटीच्या आवारात घडली.
या प्रकरणी सुरेश किसन पोकळे, सुयोग भरत शिंदे, अनिल म्हस्के, शिवराम पाटील, किसन पवार (सर्व रा. ओम हाईट्स सहकारी गृहनिर्माण संस्था, पीएमटी थांब्याजवळ, फुरसुंगी, सासवड रस्ता) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रीती किरण हरपळे (वय ३८, रा. ओम हाईट्स सहकारी गृहनिर्माण संस्था, पीएमटी थांब्याजवळ, फुरसुंगी, सासवड रस्ता) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रीती हरपळे यांचे पती किरण ओम हाईट्स सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष आहेत. सोसायटीच्या नावाने हरपळे यांनी समाजमाध्यमात समूह तयार केला होता.
आरोपी सुरेश पोकळे यांनी किरण यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मला सोसायटीच्या नावाने सुरू केलेल्या समुहातून काढून का टाकले, अशी विचारणा पोकळे याने केली. त्यानंतर पोकळे किरण यांच्या कार्यालयात गेला. तेव्हा तुम्ही समुहावर कामाशिवाय अन्य संदेश पाठवत असल्याने समुहातून काढून टाकल्याचे किरण यांनी सांगितले. त्यानंतर पोकळे, साथीदार शिंदे, म्हस्के, पाटील, पवार यांनी किरण यांना बेदम मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक शेळके या प्रकरणाचा तपास करत आहेत.