लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये गंगाधाम-कोंढवा रस्त्यावरील काही भाग डोंगर माथा-डोंगर उताराचा असल्याने या भागात बांधकामाला परवानगी नसतानाही गेल्या काही वर्षांत या रस्त्याच्या दुतर्फा शेकडो गोदामे उभारण्यात आल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. गंगाधाम येथे रविवारी लागलेल्या आगीच्या घटनेमुळे या रस्त्यावरील गोदामांचा प्रश्न ऐरणीवर आला असून केवळ नोटीस बजाविण्याचा देखावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
गंगाधाम येथे आग लागण्याची घटना रविवारी घडली. त्यामध्ये काही गोदामे भस्मसात झाली. या पार्श्वभूमीवर या रस्त्यावरील गोदामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मार्केट यार्डपासून अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावर कोंढव्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा मोठी गोदामे गेल्या काही वर्षांत उभारण्यात आली आहेत. महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये यातील काही भाग डोंगर माथा-डोंगर उताराचा दर्शविण्यात आला आहे. त्यानुसार या भागात बांधकामांना परवानगी नाही. या भागातील गोदामांना महापालिका प्रशासनाकडून केवळ नोटीस बजाविण्यात आली आहे. या गोदामांना महापालिका प्रशासनाकडून तिप्पट मिळकतकर लावण्यात आला. काही दिवसांपूर्वी कर भरण्यासंदर्भातील नोटीस महापालिकेने बजाविल्या होत्या. त्यानंतर महापालिकेकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.
आणखी वाचा-पिंपरीतील ५२ ‘रूफ टॉप’ हॉटेल रडारवर
कारवाई करण्याऐवजी गंगाधाम-कात्रज कोंढवा भागाला जाणारा रस्ता विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. गंगाधाम चौकात सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यासाठी १०० कोटींचा खर्च अपेक्षित असून, त्याला मंजुरीही देण्यात आली आहे.