Pune News तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चर्चेत आलं आहे. या रुग्णालयाने तनिषा भिसे यांच्या कुटुंबाकडे १० लाख रुपये अनामत रक्कम मागितली ती वेळेत न भरता आल्याने साडेपाच तास तनिषा भिसे या रुग्णालयात उपचारांविना होत्या, तसंच पुढे त्यांना आणखी दोन रुग्णालयांत नेण्यात आलं. ज्यानंतर मणिपाल रुग्णालयात त्यांची प्रसूती झाली आणि त्यांनी दोन मुलींना जन्म दिला. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वच स्तरात संताप व्यक्त होतो आहे. दरम्यान दीनानाथ मंगेशकर फाऊंडेशनला ही जागा खिलारे कुटुंबाने दिली होती. ही जागा कशी मिळाली? त्याबाबत भाऊसाहेब खिलारेंचे वारस चित्रसेन खिलारे यांनी भाष्य केलं आहे.

काय म्हणाले चित्रसेन खिलारे?

“एरंडवणे भागातील जमिनी आमच्या पूर्वजांकडे होत्या ज्या त्यांनी दान केल्या होत्या. १९८९ च्या दरम्यान लता मंगेशकर यांनी भाऊसाहेब खिलारे यांच्याकडे विचारणा केली की आम्हाला वडिलांच्या नावाने म्हणजेच दीनानाथ मंगेशकरांच्या नावाने रुग्णालय सुरु करायचं आहे तर पुण्यात जागा मिळू शकेल का? त्यावर भाऊसाहेब खिलारे यांनी ती जागा उपलब्ध करुन दिली. लता मंगेशकर या पुण्यातल्या नवी पेठ भागात वास्तव्यास होत्या तेव्हापासून माझे वडील आणि लता मंगेशकर यांचा चांगला परिचय होता. त्यानंतर आत्ताची जागा त्यांनी लता मंगेशकर यांना सुचवली. त्यावेळी बहुदा शरद पवार मुख्यमंत्री असतील. त्यांची आणि लता मंगेशकर यांची भेट झाली आणि त्यांनी जागेसाठी मागणी केली. त्या दरम्यान यूएलसी कायद्यानुसार पुण्यातल्या जमिनी त्या कायद्याच्या अंतर्गत आल्या होत्या.” असं खिलारे यांनी म्हटलं आहे.

भाऊसाहेब खिलारी आणि शरद पवार यांच्यातही चर्चा

“भाऊसाहेब खिलारी आणि शरद पवार यांची चर्चा झाली. त्यावेळी शरद पवार भाऊसाहेबांना म्हणाले की तुमच्या बऱ्याच जागा तुम्ही आत्तापर्यंत दान केल्या आहेत, चांगलं रुग्णालय उभं राहात असेल तर काही हरकत आहे का? ज्यानंतर भाऊसाहेब खिलारेंनी जागेबाबत चर्चा केली. सगळी मोठी रुग्णालयं पुण्यातल्या पूर्व भागात होती, या भागात रुग्णालयं नव्हती. आपल्या भागात चर्चला जागा आम्ही दिली होती, गरवारे कॉलेजला जागा दिली होती. पण पश्चिम भागात रुग्णालय नव्हतं. त्यामुळे एरंडवणे भाग, कोथरुड, औंध या भागातल्या रुग्णांसाठी चांगलं रुग्णालय उभं राहात असेल तर पुण्य घडेल. त्यानंतर शरद पवार आणि भाऊसाहेब यांची चर्चा झाली. तसंच कुटुंबाचीही चर्चा झाली. भाऊसाहेबांनी होकार दिला, शरद पवारांनी होकार दिला आणि ती जागा दिनानाथ मंगेशकर फाऊंडेशनला दिली.” अशी माहिती चित्रसेन खिलारी यांनी दिली.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे प्रकरणानंतर मलाही फोन आले-चित्रसेन खिलारे

“सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरुन वाद सुरु झाला आहे त्यानंतर अनेक फोन मलाही येत आहेत. तुमची जागा असताना हे असं कसं काय होतं आहे मला विचारणा झाली. व्हॉट्स अॅपवर एक पोस्ट फिरत होती की ही मूळ जागा बाळासाहेब फुलेंची आहे. त्यांना हा गैरसमज झाला. बाळासाहेब खिलारे हे आमच्या वडिलांचे म्हणजेच भाऊसाहेबांचे मित्र होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एक असंवेदनशील विषय झाला ही घटना दुर्दैवी आहे. खिलारे कुटुंबाला आपली जागा गेली याच्याशी काही घेणंदेणं नाही. अजूनही जागा लागल्या तर आम्ही उपलब्ध करुन देऊ. ज्या हेतूने खिलारे कुटुंबाने किंवा इतर लोक जागा देत असतील तो हेतू साध्य होतो आहे का?” हा प्रश्न आहे असं चित्रसेन खिलारे म्हणाले.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेली घटना दुर्दैवी-चित्रसेन खिलारे

“आमच्या वडिलांची धारणा होती की एका हाताने केलेलं दान दुसऱ्या हाताला समजता कामा नये. त्यांनी कधीही कुठेही श्रेय घेतलं नाही. उदाहरण म्हणून सांगतो, एरंडवणे गावठाण भागातील म्हात्रे पुलाजवळ महादेव मंदिर होतं, ते पुरातन होतं. छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेल्याचा उल्लेखही त्याबाबत होता. ते मंदिर रस्त्यात येत होतं आणि ती जागा आमच्याकडे महापालिकेने मागितलं. माझ्या वडिलांनी तातडीने होकार दिला आणि सांगितलं की जनहितासाठी हे काम होतं आहे. रस्ता रुंदीकरण महत्त्वाचं आहे तर आपण मंदिर दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करु त्या दरम्यान अनेक संघटना आल्या आणि जागा का देत आहात ही विचारणा केली. तेव्हा भाऊसाहेब खिलारे निर्णयावर ठाम राहिले होते. खिलारे कुटुंबाची जागा दीनानाथ मंगेशकर फाऊंडेशनला दिली हा विषय गौण आहे मात्र तिथे जे घडलं ती घटना दुर्दैवी आहे असं चित्रसेन खिलारे म्हणाले आहेत.” चित्रसेन खिलारे यांनी एबीपी माझाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे आणि संपूर्ण माहिती दिली आहे.

आता आमची इतकीच अपेक्षा आहे की…

“दीनानाथ मंगेशकर रुग्णालय ट्रस्टला देऊन ३४ एक वर्षे झाली आहेत. आता आमची विनंती इतकीच आहे की येणाऱ्या काळात अशा घटना घडू नयेत. चूक कुणाची आहे ते आता अहवाल आल्यानंतर समोर येईलच. भिसे कुटुंबाने रिस्क घेतली असावी हे आपण मान्य करु. पण जेव्हा भिसे कुटुंब रुग्णालयात आले तेव्हा त्यांना दाखल करुन घ्यायला हवं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु करायला हवं होतं. मात्र तसं घडलं नाही आता यापुढे तरी अशा घटना घडू नयेत अशी अपेक्षा आम्हाला खिलारे कुटुंबाला आहे.” असं चित्रसेन खिलारे यांनी म्हटलं आहे.