लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : संघर्ष करणे, लढणे रक्तात आहे. मात्र हा संघर्ष लोकांच्या सेवेसाठी, सर्वसामन्यांच्या कल्याणासाठी सुरू आहे. त्यामुळे लोकसेवेच्या वाटचालीतील आशीर्वाद कायम रहावा, असे आवाहन काँग्रेसचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केले.

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील विजयाच्या वर्षपूर्तीनिमित्त मतदारसंघात कृतज्ञता फेरी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी धंगेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे आवाहन केले. नगरसेवक म्हणून काम करताना आमदार म्हणून विधानसभेत पाठविले. सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जनतेने दाखविलेला हा विश्वास आहे, असे धंगकेर यांनी सांगितले.

आणखी वाचा-लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती उद्या ठरणार?

मतदारसंघातील जुने वाडे, शहरातील वाहतूक, पाणी प्रश्न, मेट्रो, वाढते गुन्हे, पुणेकरांची सुरक्षितता, अमली पदार्थ तस्करी प्रकरण, आरक्षण अशा असंख्य विषयांवर विधानसभेत आवाज उठवला. अनेक प्रश्नांची सोडवणूक केली, याचे मला समाधान आहे. कोणत्याही पदापेक्षा माणूसपण महत्त्वाचे आहे. त्यामुळे लोकांच्या अडचणीला धावू जातो, असे धंगेकर यांनी सांगितले. ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर येथून दर्शनाने फेरीला सुरुवात झाली. अनेक सामान्य लोकांच्या, व्यावसायिकांच्या, विक्रेत्यांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How did mla ravindra dhangekar celebrate the anniversary of victory in kasba pune print news apk 13 mrj