पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या १२ महिन्यांत घरांच्या किमती ८.९२ टक्क्याने वाढल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत घरांच्या किमतीत तब्बल २८ टक्के वाढ झाली आहे. याचवेळी ग्राहकांकडून मोठ्या आकाराच्या घरांना जास्त पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.
गेरा डेव्हलपमेंट्सने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील गृहनिर्माण क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, गेल्या १२ महिन्यांत घरांच्या किमती सरासरी ८.९२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. नवीन गृहप्रकल्पांचा विचार करता ही वाढ १५.३९ टक्के आहे. गेल्या २४ महिन्यांत घरांच्या किमती १९.९५ टक्के आणि ३६ महिन्यांत २८.०६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. घरांच्या किमती २०१९ मध्ये घसरल्या होत्या. त्यानंतर घरांच्या किमतीत दरवर्षी सरासरी ७.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे जून २०२० मध्ये घरांचा सरासरी दर प्रतिचौरसफूट ४ हजार ६४४ होता, तो जून २०२४ मध्ये ६ हजार २९८ रुपयांवर गेला आहे.
मोठ्या आकाराच्या घरांना मागणी वाढताना दिसून येत आहे. गेल्या १२ महिन्यांत १ हजार चौरसफुटांपेक्षा छोट्या घरांच्या मागणीत १९ टक्के घट झाली आहे. याचवेळी १ हजार चौरसफुटांपेक्षा मोठ्या घरांच्या मागणीत १२ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. नवीन गृहप्रकल्पांचे प्रमाण ५.८ टक्क्यांनी वाढले आहे. नवीन गृहप्रकल्पातील एकूण घरांची संख्या ९९ हजार १६६ वर पोहोचली आहे. त्यात ५ हजार ८१ रुपये प्रति चौरस फूट अथवा त्यापेक्षा कमी किंमत असलेल्या घरांची संख्या अधिक आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सिंहगड रस्ता भागात नवीन प्रकल्प जास्त
सिंहगड रस्ता, आंबेगाव, नऱ्हे, धायरी या भागातील नवीन गृहप्रकल्पांची संख्या सर्वाधिक २७ टक्क्यांनी वाढली आहे. त्याखालोखाल खराडी आणि वाघोलीत ही वाढ २५ टक्के आहे. बालेवाडी, बाणेर, हिंजवडी भागात ही वाढ २१ टक्के आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण नवीन गृहप्रकल्पांमध्ये पिंपरी-चिंचवडमधील प्रकल्पांचे प्रमाण ४२ टक्क्यांवर पोहोचले आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
घरांच्या किमतीत वाढ होत असतानाच घरांच्या आकारामध्येही वाढ होत आहे. ग्राहकांकडून मोठ्या आकाराच्या घरांना अधिक मागणी आहे. विक्रीच्या तुलनेत नवीन घरांच्या पुरवठ्यातही वाढ झाली आहे.- रोहित गेरा, व्यवस्थापकीय संचालक, गेरा डेव्हलपमेंट्स