लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) परीक्षा रविवारी पुण्यासह राज्य आणि गोव्यातील केंद्रांवर झाली. परीक्षेला नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी ८५ टक्के विद्यार्थी उपस्थित होते. पुणे केंद्रातून सर्वाधिक १७ हजार २४५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
सहायक प्राध्यापक पदासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या (नेट) धर्तीवर राज्यस्तरावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षा घेण्यात येते. महाराष्ट्र आणि गोव्यातील १७ शहरांतील २८९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा झाली. गेल्यावर्षी या परीक्षेसाठी एक लाख १९ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. तर यंदा एक लाख २८ हजार २४३ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एक लाख ९ हजार १५४ उमेदवारांनी परीक्षा दिली.
आणखी वाचा-काँग्रेस, वंचितच्या उमेदवाराला मतदारांची मदत; भाजप उमेदवाराकडून मतदारांना ‘मोदींचा नमस्कार’
नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) जून आणि डिसेंबर अशा दोन सत्रात ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येते. त्याप्रमाणे सेट परीक्षाही वर्षातून दोनवेळा घेण्याची मागणी आहे. यंदाची सेट परीक्षा पारंपरिक (लेखी) पद्धतीची शेवटची परीक्षा होती. या पुढील सेट परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याने विद्यापीठ दोन सत्रांत परीक्षेचा निर्णय घेणार का, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.