लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांसाठी उत्तीर्णतेचे निकष प्रचलित नियमांप्रमाणेच असणार आहेत. ज्या वर्षी निकषांत बदल होतील, त्या वर्षी मंडळाकडून स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल, असे स्पष्टीकरण राज्य मंडळाने दिले आहे.

राज्य मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांत उत्तीर्ण होण्यासाठी ३५ गुण मिळवावे लागतात. मात्र, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ची शालेय स्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात या नियमात बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यानुसार दहावीच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयात ३५ गुणांपेक्षा कमी आणि २० गुणांपेक्षा अधिक गुण असल्यास अकरावीला प्रवेश घेता येणार असल्याचे आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दहावीच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान विषयांत उत्तीर्णतेच्या निकषात बदल करण्यात आला नसून, प्रचलित निकषच लागू असल्याचे स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा-Maharashtra Board 10th 12th Exam Date: राज्य मंडळाकडून बारावी, दहावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर… लेखी, प्रात्यक्षिक परीक्षा कधी सुरू होणार?

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, की राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील तरतूद केवळ प्रस्तावित आहे. त्याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र, या बाबत पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असल्याचे निदर्शनास आल्याने राज्य मंडळाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. येत्या परीक्षेसाठी प्रचलित नियमात कोणताही बदल केलेला नाही. कोणताही बदल करायचा असल्यास त्यापूर्वी शासन मान्यता, शासन निर्णय अशा प्रक्रिया असते.

राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी तिसरी ते बारावी या स्तरासाठीचा राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा अंतिम मसुदा जाहीर केला. या मसुद्याला राज्य सुकाणू समितीने मान्यता दिली आहे. या आराखड्यानुसार शालेय शिक्षणाच्या स्तरावर अनेक बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. आता राज्यात नवीन सरकार अस्तित्त्वात आल्यावर राज्य अभ्यासक्रम आराखड्याची पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे.