लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्यातील तंत्रनिकेतनांतील दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एक लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. काही तंत्रनिकेतनांमध्ये मराठी-इंग्रजी या द्विभाषिक माध्यमाचा पर्यायही उपलब्ध असून, विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी २५ जूनपर्यंतची मुदत आहे. प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी २ जुलैला प्रकाशित करून प्रवेशाच्या तीन फेऱ्या होणार आहेत.

तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी ही माहिती दिली. नवीन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम आणि कार्यप्रशिक्षण विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या (डीटीई) माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांमधून देण्यात येत आहे. अभियांत्रिकी पदवी घेण्यासाठी किंवा नोकरी, स्वयंरोजगारासाठी दहावीनंतर तीन वर्षे मुदतीचा तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रम हा उपयुक्त पर्याय मानला जातो.

आणखी वाचा-बीबीए, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रम प्रवेशांसाठी मोठा निर्णय… आता काय होणार?

राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर २९ मेपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. आतापर्यंत १ लाख १ हजार १०४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा अर्जसंख्या वाढण्याची शक्यता आहे. तंत्रनिकेतनांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, विदा विज्ञान, रोबोटिक्स असे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. पदविका प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.