पुणे : राज्यातील ३८८ खासगी शाळा अनधिकृतरीत्या चालवल्या जात असल्याचे असल्याची कबुली शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळात दिली. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील २२ अनधिकृत शाळांपैकी ११ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तर उर्वरित सहा शाळांना मान्यता मिळाली असून, पाच शाळांना इरादापत्र प्राप्त झाल्याची माहितीही भुसे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधिमंडळ अधिवेशनात राज्यातील अनधिकृत शाळांसंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नाला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिले. शिक्षण आयुक्तांच्या १८ जुलै २०२३ च्या पत्रानुसार राज्यात अनधिकृत ६६१ शाळा चालवल्या जात होत्या. गेल्या दोन वर्षांत शासनाद्वारे घेतलेल्या विशेष मोहिमेद्वारे ११७ शाळा बंद करण्यात आल्या. ठाणे जिल्ह्यात प्राथमिकच्या ६४, माध्यमिकच्या २४ अशा एकूण ८८ अनधिकृत शाळा चालवल्या जात आहेत. त्यापैकी ४१ शाळांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अनधिकृत शाळा बंद करण्याची कार्यवाही शिक्षणाधिकाऱ्यांकडून सुरू आहे. लातूर जिल्ह्यातील अनधिकृत शाळेवर नियमानुसार दंड आकारण्यात आला आहे.

अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश शासन स्तरावरून वेळोवेळी देण्यात आले आहेत. २०१० च्या शासन निर्णयातील तरतुदींचे पालन करत असलेल्या २०१३ पूर्वीच्या अनधिकृत शाळा, महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा अधिनियम २०१२ मधील तरतुदींची पूर्तता करत असलेल्या शाळांबाबत तपासणी करून शासन मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. २०१३ नंतरच्या अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या शाळा अधिनियमांतील तरतुदीचे पालन करत असल्यास संबंधित शाळांच्या प्रस्तावावर तरतुदीनुसार कार्यवाही करण्याच्या, तसेच निकषांची पूर्तता करत नसलेल्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे लगतच्या शाळेत समायोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही भुसे यांनी स्पष्ट केले.