उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी राज्यभरात लाटलेल्या जमिनींविषयीची माहिती महाराष्ट्रातील जतनेला द्यावी, अशी मागणी भारिप-बहुजन महासंघाचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
सांगली महापालिका निवडणुकीमध्ये आता उमेदवारांच्या हाती काहीच राहिलेले नाही. मतदार हेच उमेदवारांकडून मागणी करून पैशाचा खेळ मांडत आहेत याकडे लक्ष वेधून आंबेडकर म्हणाले,की या निवडणुकीतील एका प्रचार सभेत पुण्यातील पतंगरावांच्या संस्थेची जागा महार वतनाची असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. त्यामुळे आता अजित पवारांनी राज्यभरात कुठल्या जागा बळकावल्या आहेत याची यादी पतंगरावांनी जाहीर करावी. निवडणूक खर्चाबाबत जाहीर वाच्यता केल्याने निवडणूक आयोगापाठोपाठ आता प्राप्तकर विभागाचाही ससेमिरा भाजपनेते गोपीनाथ मुंडे यांच्यामागे लागला आहे. त्यामुळे मुंडे यांनी ‘आ बैल मुझे मार’, अशीच स्वत:ची अवस्था करून घेतली आहे.
डाव्या पक्षांच्या पुढाकाराने होऊ घातलेल्या तिसऱ्या आघाडीत नितीशकुमार, ओमप्रकाश चौताला, नवीन पटनाईक, जयललिता, कुमारस्वामी हे बिगर भाजप-काँग्रेस आघाडीचे आजी-माजी मुख्यमंत्री सहभागी होऊ शकतात. यामध्ये मुलायमसिंग यादव कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे आणि डाव्यांच्या पुढाकाराने ही आघाडी होणार असेल तर, त्यामध्ये ममता बॅनर्जी यांना कसे स्थान मिळणार हे प्रश्न आहेत. पण, ितसरी आघाडी होईल, असे आपल्याला वाटते, असेही आंबेडकर यांनी सांगितले.
आर्थिक अस्थैर्य निर्माण करण्यासाठीच बोधगया येथे बॉम्बस्फोट – आंबेडकर
जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्ध यांच्या बोधगया येथील बॉम्बस्फोट हे केवळ दहशत पसरविण्यासाठी झालेले नाहीत,तर त्यामागे आर्थिक अस्थैर्य निर्माण करण्याचा कट आहे, असे मत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. सध्या डॉलर-रुपया विनिमयाचा दर ६० रुपये आहे. तो ७५ रुपयांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे तेलाची आयात कमी होऊन वाहतूक खर्चात वाढ होईल आणि याचे पर्यावसन महागाईमध्ये होईल, अशी व्यूहरचना आहे. त्यामुळे या स्फोटांकडे केवळ दहशतवादी कारवाई म्हणून न पाहता आर्थिक अस्थैर्य निर्माण करण्यासाठीचा कट म्हणूनच पाहिले पाहिजे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आंदोलनांच्या माध्यमातून या स्फोटांचा निषेध करण्यापेक्षाही सरकारला सहकार्य करण्याची भूमिका ठेवण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader