पुणे : यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर दरम्यानच्या चार महिन्यांत सरासरीपेक्षा २६ टक्के जास्त पाऊस झाला आहे. राज्यात सरासरी ९९४.५ मिमी पाऊस पडतो. यंदा मात्र १२५२.१ मिमी पाऊस पडला आहे. राज्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला असला, तरी सरासरीपेक्षा हिंगोलीत ३५ टक्के आणि अमरावतीत दोन टक्के कमी पाऊस पडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, एक जून ते ३० सप्टेंबर, या चार महिन्यांत राज्यात सर्वदूर चांगला पाऊस झाला आहे. कोकण विभागात २९ टक्के अधिक पाऊस पडला आहे. सरासरी २८७०.८ मिमी पाऊस पडतो; यंदा ३७१०.६ मिमी पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात ३९ टक्के अधिक पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरी ७४७.४ मिमी पाऊस पडतो, यंदा १०३५.८ मिमी पाऊस पडला आहे. मराठवाड्यात २० टक्के अधिक पाऊस पडला आहे. सरासरी ६४२.८ मिमी पाऊस पडतो, ७७२.५ मिमी पाऊस पडला आहे. विदर्भात १७ टक्के अधिक पाऊस पडला आहे. सरासरी ९३७.३ मिमी पाऊस पडतो, यंदा १०९८.५ मिमी पाऊस पडला आहे.

हेही वाचा – ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना शिवीगाळ प्रकरणी २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा

नगरमध्ये सर्वाधिक पाऊस

राज्यातील सात जिल्ह्यांत सरासरीपेक्षा ४० टक्क्यांहून जास्त पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक ४९ टक्के (६७८ मिमी) पाऊस नगर जिल्ह्यात झाला आहे. नगरसह सिंधुदुर्ग, जळगाव, कोल्हापूर, नंदूरबार, नाशिक, पुणे आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा ४० टक्क्यांहून अधिक पाऊस पडला आहे.

हेही वाचा – राज्यातील उद्योग पलायन ऐरणीवर! विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चाकण एमआयडीसीवरून महायुतीची कोंडी

हिंगोलीत सर्वांत कमी पाऊस

राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला असला, तरीही हिंगोलीत सरासरीपेक्षा ३५ टक्के कमी पाऊस झाला आहे. हिंगोलीत सरासरी ७५८.३ मिमी पाऊस पडतो, यंदा ४८९.९ मिमी पाऊस पडला आहे. जूनपासूनच सरासरी कमी पर्जन्यवृष्टी राहिली आहे. अमरावतीत सरासरीपेक्षा दोन टक्के कमी पाऊस झाला आहे. सरासरी ८२२.९ मिमी पाऊस पडतो, यंदा ४८९.९ मिमी पाऊस झाला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How much rain fell in maharashtra during this monsoon season find out where least most rainfall occurred pune print news dbj 20 ssb