लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी सर्व प्रकारे आवाहने करूनही मिरवणूक दणदणाटी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी ध्वनिपातळीत घट होऊनही ध्वनिप्रदूषणाच्या सर्व मर्यादा ओलांडून यंदाच्या मिरवणुकीतही सरासरी ९४.८ डेसिबल ध्वनि पातळीची नोंद झाली. त्यातही बेलबाग चौक आणि होळकर चौकात सर्वाधिक ११८ डेसिबल ध्वनिपातळी नोंदवली गेली.
सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी मंगळवारी आणि बुधवारी लक्ष्मी रस्त्यावरील दहा प्रमुख चौकांतील ध्वनिपातळीच्या दर चार तासांनी शास्त्रीय पद्धतीने नोंदी घेतल्या. त्या नोंदींच्या विश्लेषणातून ध्वनिप्रदूषणाची स्थिती स्पष्ट झाली. प्रा. महेश शिंदीकर यांच्या मार्गदर्शनाली केलेल्या या अभ्यासात मृणाल खुटेमाटे, ईशिता हन्माबादकर, आयुष लोहोकरे, आदित्य फाळके, आदित्य जोशी, तेजस संजीवी, मोहित कंडोळकर, ऋतुराज मालोडे, श्रेया शिंदे, वसुंधरा जानवडे, प्रेम दुपारगडे, क्षितिजा मेटकरी, अभिराज वैद्य, श्रुती कुलकर्णी, श्रेया कारंडे, सौरीश डांगे, वैभव भारगळ, वेदांत गोंधळेकर, सोहन भिंगेवार, आशिष ढगे या स्वयंसेवक विद्यार्थ्यांचा समावेश होता. गेल्यावर्षी सरासरी १०१.३ डेसिबल ध्वनिपातळी नोंदवली गेली होती.
आणखी वाचा-Pune Ganesh Visarjan 2024 : शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक दुपारी चार वाजेपर्यंत संपण्याची शक्यता
नियमावलीनुसार औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ डेसिबल, रात्री ७० डेसिबल, व्यावसायिक क्षेत्रात दिवसा ६५ डेसिबल, रात्री ५५ डेसिबल, निवासी क्षेत्रात दिवसा ५५ डेसिबल, रात्री ४५ डेसिबल, तर शांतता क्षेत्रात दिवसा ५० डेसिबल, रात्री ४० डेसिबल असणे अपेक्षित असते. मात्र ही ध्वनिमर्यादा पाळली गेली नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ध्वनिक्षेपक, ढोलताशांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या दणदणाटामुळे यंदा सरासरी ९४.८ डेसिबल ध्वनिपातळीची नोंद झाली.
यंदाच्या मिरवणुकीतील सरासरी ध्वनिपातळी गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाली. मात्र नोंदवली गेलेली ध्वनिपातळी मानक पातळीपेक्षा अधिकच आहे. गेल्या काही वर्षांत कार्यकर्ते आणि भाविकांमध्ये ध्वनिप्रदूषणाबाबत जागरूकता वाढत आहे. त्यामुळे मंडळ कार्यकर्ते आणि पोलिसांनी ध्वनिपातळी नोंदीच्या कामात मदत केली. पोलिस आणि प्रशासनाने मंगळवारी रात्रीपर्यंत मर्यादित ध्वनिक्षेपकांना परवानगी दिल्याने लक्ष्मी रस्त्यावर प्रामुख्याने पारंपरिक वाद्यांचेच प्रमाण जास्त होते. मात्र बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून दणदणाट सुरू झाला, असे सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र आणि उपयोजित विज्ञान विभागाचे प्रा. महेश शिंदीकर यांनी सांगितले.
आणखी वाचा-पिंपरी : अनैतिक संबंधाच्या संशयावरून झोपेतच गळा चिरून तरुणाचा खून
दहा प्रमुख चौकातील सरासरी ध्वनिपातळी
बेलबाग चौक – ९९.८
गणपती चौक – ९५.८
लिम्बराज चौक – ९८.१
कुंटे चौक – ९४.९
उंबऱ्या गणपती चौक – ९२.२
गोखले चौक – ९३.५
शेडगे विठोबा चौक – ९२.८
होळकर चौक – ९४
टिळक चौक – ९६.७
खंडूजी बाबा चौक – ९०.२