पुणे : प्रगत संगणन विकास केंद्राच्या (सी-डॅक) तिरुअनंतपुरम कार्यालयातर्फे देशातील शेतकऱ्यांच्या गरजा विचारात घेऊन स्मार्टफोनवर आधारित, किफायतशीर असलेली ‘स्मार्टफार्म’ ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे शेतीला पाणी देणे, खत घालणे अशा कामांचे नियोजन करण्यासह शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे शक्य असून, तंत्रज्ञान हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करून लवकरच ही प्रणाली बाजारपेठेत आणण्यात येणार आहे.
सी-डॅकचा ३७वा वर्धापन दिन मंगळवारी (९ एप्रिल) साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने झालेल्या पत्रकार परिषदेत कार्यकारी संचालक कर्नल (नि.) ए. के. नाथ, तिरुअनंतपुरम कार्यालयातील सहसंचालक अनीश सत्यन यांनी ही माहिती दिली. स्मार्टफार्म प्रणालीचे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. आशिष लेले, सी-डॅकचे महासंचालक ई. मगेश या वेळी उपस्थित राहणार आहेत.
अनीश म्हणाले, की शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाणी देणे, खत घालणे, पर्यावरण आणि माती स्थिती या बाबत माहिती देण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. शेतजमिनीच्या क्षेत्रफळानुसार, भौगोलिक स्थितीनुसार स्मार्टफार्म प्रणालीचे सेन्सर्स शेतात बसवण्यात येतात. ही प्रणाली थ्रीजी, फोरजी, फाईव्हजीवर चालते. केरळमधील शेतकऱ्यांसह दोन वर्षे या प्रणालीच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यातील काही शेतकऱ्यांनी त्यांचे उत्पन्न दहा पटीने वाढल्याचे सांगितले. मोबाइल उपयोजनावर ही प्रणाली चालते. त्यामुळे प्रत्यक्ष शेतीमध्ये नसतानाही कामांचे नियोजन करणे शक्य आहे. अशा प्रकारची उत्पादने बाजारात उपलब्ध असली, तरी स्मार्टफार्म अधिक किफायतशीर आणि देशातील शेतकऱ्यांच्या गरजा विचारात घेऊन तयार करण्यात आले आहे. प्रादेशिक भाषांमध्येही ही प्रणाली माहिती देऊ शकते.
सी-डॅककडून क्वांटम मिशनचा प्रस्ताव
सी-डॅकतर्फे केंद्र सरकारला राष्ट्रीय क्वांटम मिशनचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यात क्वांटम सिम्युलेटर्स तयार करणे, क्वांटम संगणक तयार करणे, महासंगणक आणि क्वांटम संगणकाचा एकत्रित वापर करणे अशा प्रकल्पांचा समावेश आहे. क्वांटम सिम्युलेटर्स क्लाऊडवर चालवले जातील, त्यातून संशोधनाला चालना मिळेल, अशी माहिती नाथ यांनी दिली.