नाजूक लालुग्या मोहरांनी रायआवळ्याच्या फांद्या मोहरून गेल्या होत्या, काही दिवसांत टप्पोरे रायआवळे एकमेकांना खेटून दाटीवाटीने फांदीला बिलगले. गच्चीत येणारा प्रत्येक जण ‘वा, आवळे कित्ती सुंदर!’ असे उद्गार काढून दोन-चार आवळे तोंडात टाकायचा, कारण हा मोह आवरणे कठीण. आंबट-गोड खोबरी चवीचे हे आवळे खाताना बालपण नाही आठवले तरच नवल. रायआवळा युफोरबेसी कुटुंबातला मध्यम उंचीचा, फांद्या कमकुवत पण दिसतो सुंदर. पानांची रचना फार छान, लागवड बीपासून किंवा फांदी लावून सहज करता येते. भरभर वाढते अन् भरपूर आवळे देते. आवळे मीठ लावून खायला, चटणी, जेली, मुरांब्यासाठी, लोणच्यासाठी वापरता येतात. मीठ, मिरची, आवळ्याचा ठेचा पोह्य़ाची लज्जत वाढवतो.

डोंगरी आवळा, नावाप्रमाणे डोंगरावर, जंगलातून सहज उगवतो. मोठय़ा प्रमाणात सापडतो. आपले आरोग्य राखण्यात याचे स्थान फार वरचे. हा आवळा फायलॅन्थेसी कुटुंबातला सदस्य. कलमी आवळे पांढुरके, चकचकीत, आकाराने मोठे असतात. साधे डोंगरी आवळे आकाराने लहान, हिरवट, पिवळट असतात. तुरट हीच याची मुख्य चव. आपण लावताना आवर्जून साध्या, डोंगरी आवळ्याची झाडं लावावीत. बियांपासून रोप तयार होतात पण उगवण कमी व फार हळू वाढतात. पाच-सहा वर्षांनंतर फळे येतात. रोपवाटिकेतून रोपं  आणून लावावीत. लोहाचा खजिना असलेल्या या फळास पाणी कमीच लागते. आवळ्याचे लोणचं, मोरावळा, आवळा पूड, सुपारी, सरबत, कॅन्डी एक ना दोन अनेक प्रकार करता येतात. शिकेकाई, फेसपॅक यासाठीसुद्धा वापरता येतो. हा बहुगुणी डोंगरी आवळा, याचे एखादे तरी झाड गृहनिर्माण सोसायटी, बंगला, फार्म हाउस सोसायटीच्या रस्त्यांवर हवे. जिथे सगळ्यांना मिळून, आवळी भोजन करता येईल. जांभूळ हा अतिपरिचित वृक्ष सध्या सुंदर पांढुरक्या फुलांनी व छोटय़ा हिरव्या जांभळांनी डवरला आहे. मायरटॅसी कुटुंबातला हा सदस्य. याच्या पानांनाही छान वास येतो. सुगंधी, पांढुरक्या, फुलांच्या सुंदर गुच्छांवर मधमाश्यांची प्रीती असते. सुरुवातीला हिरव्या रंगाची असलेली जांभळे नंतर गडद जांभळ्या रंगाची होतात. मोठी, भरपूर गराची रसरशीत जांभळे सहज मिळतात पण छोटी, कमी गराची, गडद रंगाच्या महाबळेश्वरच्या जंगलांमध्ये विपुल प्रमाणात आढळणाऱ्या अतिमधुर लेंडी जांभळाची चव काही खासच! व्हिटॅमीन सी, फॉस्फरस, मॅग्नेशियमचा साठा असलेला हा मेवा मुलांनीच नाही तर मोठय़ांनीही चाखावा असा. जांभळाचा जॅम छान होतो. जांभूळपाक व्हॅनिला आइस्क्रीमवर सॉस म्हणून वापरता येतो. जांभळाची झाडं पूर्वी रस्त्याकडेला, बंगल्यांमधून लावली जात. सध्या जांभळे काढायला माणसे नाहीत म्हणून रस्त्यावर जांभळाचा सडा पडून वाया जातात अन् एकीकडे विक्रेते दोनशे रुपये किलोने जांभळे विकतात असा विरोधाभास दिसतो. बियांपासून सहज येणाऱ्या या जांभळाचे एखादे तरी झाड आपल्या जवळ हवेच. काडी खोचताच सहज येणार, भरभर अन् अस्ताव्यस्त वाढणारं, लवकर फळं देणारे झाड तुती. वस्तुत: सगळ्या गृहनिर्माण संस्थांमध्ये हे झाड लावता येणे सहज शक्य आहे. मोरॅसी कुटुंबातील हे फळ म्हणजे व्हिटॅमीन ‘ए’, ‘के’, ‘सी’ पोटॅशियम, कॅल्शियमचा खजिना. बोटाएवढय़ा लांब हिरव्या तुती व बोटाच्या पेराएवढय़ा काळ्या जांभळ्या तुती असे प्रकार आढळतात. हिरव्या तुतीची खूप झाडं आमचे स्नेही प्रमोद फालुग्ने यांनी फ्लोरल सृजान या कृषी पर्यटनाच्या ठिकाणी लावली आहेत. ही रोप सहजी मिळत नाहीत. तुतीची पानं अनेक फुलपाखरांच्या अळ्यांना व रेशीम किडय़ाच्या बॉम्बॅकस मोरी अळीला फार आवडतात. लाल काळ्या तुतींनी लगडलेले झाड म्हणजे मुले व पक्ष्यांची चंगळच. हे फळ फार नाजूक, झाडावरून थेट तोंडात घालण्याचे पण खूप तुती आल्या तर पाक करून ठेवता येतो. अर्थात पक्ष्यांच्या तावडीतून राहिल्या तरच.

Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Leopard Mother Sacrifices Herself To Protect Her Cubs shocking video
VIDEO: “विषय काळजाचा होता” पिल्लांना वाचवण्यासाठी बिबट्या मादी सिंहाला भिडली; शेवटी आईचं प्रेम जिंकलं की सिंहाची ताकद?
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
bird was happy to see the little girl
चिमुकलीला पाहून पक्षी झाला खूश; एकमेकांची करू लागले नक्कल अन् … पाहा खेळकर पक्ष्याचा VIRAL VIDEO
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !
How to use banana peel for mosquito
घरात डासांचा सुळसुळाट वाढतोय? केळीच्या सालीचा ‘हा’ सोपा उपाय डासांचा करेल नायनाट
इयन बोथम आणि मर्व्ह ह्यूज
मैदानावरच्या हाडवैरीने वाचवला मगरींच्या तावडीतून जीव; इयन बोथम यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

करवंद हा मुलांना आवडणारा रानमेवा. रोपवाटिकेत याची रोपं मिळतात. कुंपणाला लावण्यास हिरवी भिंत होते. कच्च्या करवंदाचे मोहरी फेसून लोणचे, पिकलेल्यांचे सरबत, जॅम हे या ऋतूचे खास पदार्थ. करवंदाची फळे छानच पण फुलेही शुभ्र पांढरी अन् सुवासिक असतात.

रानमेव्यातले खास फळ बोर. गोल आकाराचे, आंबड-गोड, दळदार गराची झाडावरची बोरं खाणं पर्वणीच. बियांपासून रोपं होतात. रस्त्यांवर, माळरानावर, कमी पाण्यावर काही देखभाल न करता वाढतात अन् ‘क’ जीवनसत्त्व, कॅल्शिअम, फॉस्फरस व व्हिटॅमीन ‘बी ३’ चा खजिना आपल्याला देतात. हे दीर्घायू झाडं, थोडं उशिरा फळ देतं म्हणून जुन्या झाडांना जपलं पाहिजे. रस्ता रुंदीकरणात बंगले पाडून मॉल करताना या झाडांचे बळी जातात, याची खंत वाटते. कोथरूडच्या वुडलँड्स सोसायटीत भले मोठ्ठे बोराचे झाड पाहून इथल्या मुलांना भरपूर माकडमेवा मिळणार म्हणून आनंद झाला.

माझी आजी म्हणे घरात मुलांना माकडमेवा हवा. आजोबांनी पन्नास-साठ आंब्यांच्या झाडांबरोबर, बंगल्याच्या आवारात भरपूर माकडमेव्याची सोय केली होती. आपण हे समृद्ध बालपण पुढच्या पिढीला देणार का? हे समृद्ध, श्रीमंत बालपण देण्याची आपली जबाबदारी आहे.

प्रिया भिडे

(सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)