‘‘निवडणुकांमधील गैरप्रकार पाहिले की त्याविषयी काळजी आणि खंतही वाटते. काही वेळा झोप देखील येत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी राजकारण्यांबरोबरच लोकांचीही इच्छाशक्ती हवी. केवळ अशिक्षितच नव्हे तर, सुशिक्षित मतदारही उमेदवारांकडून पैसे, भेटवस्तू घेतात. वेगवेगळी प्रलोभने स्वीकारतात. निवडणुकांतील हे गैरप्रकार एक आयुक्त कसे थांबविणार,’’ असा सवाल राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी शनिवारी केला.
मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे माजी अध्यक्ष विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त संस्थेतर्फे महाविद्यालयीन युवकांसाठी आयोजित ‘स्पंदने युवकांची’ या शिबिराचे उद्घाटन नीला सत्यनारायण यांच्या हस्ते झाले. संस्थेचे सचिव प्राचार्य भाऊसाहेब जाधव, खजिनदार किशोर मुंगळे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य सोमनाथ सातपुते आणि सुनील बोरोडे या प्रसंगी उपस्थित होते.
एखाद्या लोकप्रतिनिधीच्या निधनामुळे पोटनिवडणूक होणे स्वाभाविक आहे. पण, त्यापेक्षाही वेगवेगळ्या कारणांनी वारंवार होणाऱ्या पोटनिवडणुकांवर प्रतिबंध घालता येईल का, या प्रश्नाला उत्तर देताना नीला सत्यनारायण म्हणाल्या, कित्येकदा अर्ज दाखल करताना उमेदवार खोटी कागदपत्रे सादर करतात. अपुरे वय असतानाही निवडणूक लढवून विजयी झाल्यावर न्यायालयात सादर झालेल्या याचिकेसंदर्भात त्यांच्याविरोधात निकाल गेल्यावरही निवडणूक घ्यावी लागते. यासंदर्भात उमेदवाराचा सदसद्विवेक आणि मतदाराची जागरुकता असणे हेच महत्त्वाचे आहे. अशा पद्धतीने होणाऱ्या पोटनिवडणुका टाळण्यासाठी राज्य निवडणूक आयुक्तांना विशेष अधिकार देण्याची आवश्यकता आहे.
उमेदवार नाकारण्याचा अधिकार आगामी निवडणुकीमध्ये मिळेल काय, याविषयी भाष्य करताना हा अधिकार सध्यादेखील अस्तित्वात असला तरी याविषयीची अंमलबजावणी होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एखाद्या मतदारसंघात ‘राईट टू रिजेक्ट’ला सर्वाधिक मतदान झाले तर त्याला विजयी घोषित करायचे की उर्वरित उमेदवारांतील अधिक मते मिळविणाऱ्याला याविषयी संभ्रमावस्था आहे. त्याचप्रमाणे अशा पद्धतीने वारंवार निवडणूक घेणे हेच एक काम होऊन जाईल. उमेदवार ताकदीचे अससतील आणि मतदार सुजाण असतील तेव्हाच नकारात्मक मतदान पद्धतीचा अधिकार उपयोगात येऊ शकतो.
प्रशासकीय अधिकाऱ्याचे काम म्हणजे भरताचे राज्य आहे. आपण जनतारुपी रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून काम करतो हे ध्यानात ठेवावे, असे मी सहकारी अधिकाऱ्यांना सांगते. सध्या प्रशासकीय सेवेचे वातावरण गढूळ असून घट्ट पाय रोवण्याची क्षमता असणाऱ्या युवकांनी प्रशासकीय सेवेमध्ये यावे, असे आवाहन नीला सत्यनारायण यांनी केले.
स्वयंसेवी संस्थाच नसाव्यात- अनिकेत आमटे
सरकार जे काम करत नाही ते स्वयंसेवी संस्था करतात. शिक्षण, आरोग्य क्षेत्रात सरकारने योग्य काम केले तर, स्वयंसेवी संस्था निर्माणच होणार नाहीत. एकीकडे सरकारचा पैसा वाया जातो आहे. तर, दुसरीकडे आम्हाला कामासाठी लोकांकडे पैसा मागावा लागतो हे वास्तव सांगत ‘लोकबिरादरी प्रकल्पा’चे अनिकेत आमटे आणि समीक्षा आमटे यांनी स्वयंसेवी संस्थाच नसाव्यात असे मत व्यक्त केले. दुसऱ्या सत्रामध्ये त्यांनी हेमलकसा येथील विविध प्रकल्पांची माहिती दिली.

Story img Loader