पुणे : डेंग्यू आणि हिवतापाच्या रुग्णांपैकी बऱ्याच जणांना सौम्य लक्षणे दिसून येतात. त्यांना रुग्णालयात दाखल करायची गरज पडत नाही. मात्र, काही रुग्णांची प्रकृती अचानक बिघडून हा आजार त्यांच्यासाठी जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून गंभीर रुग्णांवरील अद्ययावत उपचाराचे धडे सरकारी डॉक्टरांना देण्यात आले.
राज्यातील पुणे, ठाणे, कोल्हापूर व औरंगाबाद येथील सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांची दोन दिवसीय कार्यशाळा आरोग्य विभागाने आयोजित केली. डेंग्यू आणि हिवतापाच्या रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांच्या आजाराची गंभीरता कमी कशी करावी, मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रुग्णाचे व्यवस्थापन कसे करावे, अद्ययावत उपचार पद्धतीचा वापर कसा करावा आदी गोष्टींचे प्रशिक्षण डॉक्टरांना देण्यात आले. या कार्यशाळेला आरोग्य सहसंचालक डॉ. आर. बी. पवार आणि राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप उपस्थित होते.
हेही वाचा – अमरावती लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाचा दावा; महायुतीत बेबनाव
कार्यशाळेमध्ये डॉ. सुवर्णा जोशी यांनी या आजारांची तपासणी अद्ययावत पद्धतीने करण्याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. दिलीप कदम सहव्याधीग्रस्त व्यक्तींना कीटकजन्य आजारांची बाधा झाल्यास त्यांचे व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाते हे सांगितले. डॉ. सविता कांबळे यांनी गर्भवती स्त्रियांना या आजाराची लागण झाल्यावर उपचार कसा करावा याबद्दल माहिती दिली. कीटकशास्त्रीय सर्वेक्षणाचे महत्त्व डॉ. महेंद्र जगताप यांनी सांगितले तर सहायक संचालक डॉ. प्रदीप आवटे यांनी साथरोगांचा इतिहास उलगडून दाखविला. डॉ. छाया वळवी आणि डॉ. नागनाथ रेड्डीवार यांनी डेंग्यू रुग्णांचे व्यवस्थापन सहज आणि सोप्या पद्धतीने कसे करावे याचे प्रात्यक्षिक करून घेतले.
दरवर्षी ७ ते १० लाख मृत्यू
जगात संसर्गजन्य आजारांमध्ये कीटकजन्य आजारांचा वाटा सुमारे १७ टक्के असून दरवर्षी ७ लाख ते १० लाख मृत्यू या आजारांमुळे होतात. सद्य:स्थितीत डेंग्यू व हिवतापाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. याचे कारण म्हणजे झपाट्याने वाढते शहरीकरण, बदलते हवामान, वाढते तापमान आहे. हवामान बदलामुळे डेंग्यू हा जागतिक चिंतेचा विषय बनला आहे.