प्रादेशिक भाषेतून उत्तरपत्रिका लिहू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी पदवीपर्यंतचे शिक्षण संबंधित भाषेतून पूर्ण करण्याची अट ‘केंद्रीय लोकसेवा आयोग’ने (यूपीएससी) घातली असली, तरी या नियमाची योग्य तपासणी करणाऱ्या यंत्रणेचा अभाव आणि एकूणच माध्यम भाषेविषयीची गुंतागुंत यामुळे उमेदवारांच्या माध्यमाची पडताळणी यूपीएससीकडून कशी केली जाणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
महाराष्ट्रातील बहुतेक विद्यापीठांमध्ये उमेदवाराच्या पदवी गुणपत्रिकेवर माध्यम भाषेचा उल्लेख केला जात नाही. नागपूरसारख्या काही विद्यापीठांचा याला अपवाद आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील बहुतांश विद्यापीठे पदवी गुणपत्रिकेवर माध्यम भाषेचा उल्लेख करत नाहीत. त्यामुळे उमेदवारांच्या पदवीपर्यंतच्या भाषा माध्यमचा शोध यूपीएससी कसा घेणार असा प्रश्न आहे.
महाराष्ट्रात अनेक विद्यापीठांमध्ये शिक्षणाचे माध्यम हे इंग्रजी असतानाही उत्तरपत्रिका मराठीतून लिहिण्याचा पर्याय उपलब्ध असतो. अनेक विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमातील काही विषय हे इंग्रजीतून आणि काही विषय मराठीतूनही देता येतात. या बाबत प्रत्येक विद्यापीठाची कार्यशैली वेगळी आहे.
बहुतेक विद्यापीठांमध्ये वैद्यकीयच्या काही शाखा, कला, विधी व वाणिज्य शाखेचे जवळपास सर्वच विषयांच्या परीक्षांकरिता मराठी माध्यम निवडता येते. मात्र, हे विषय प्रत्येक महाविद्यालयांतून मराठीतून शिकविले जातातच असे नाही. कारण, महाविद्यालयातील अध्यापनाचे माध्यम इंग्रजीच असते. पण, इंग्रजीतून उत्तरे लिहिणे सोईचे वाटत नाही, म्हणून काही मुले मराठी अभ्यास साहित्याच्या आधारे मराठीतूनच उत्तरपत्रिका लिहितात. अशावेळी विद्यार्थ्यांचे कोणते माध्यम गृहीत धरले जाणार? केवळ उत्तरपत्रिका लिहिण्याइतपत मराठीचा आधार , विधी, वाणिज्य शाखेत तर सहापैकी तीन किंवा दोन विषय इंग्रजीतून दिले आणि उरलेले मराठीतून असाही प्रकार होतो. अशा विद्यार्थ्यांना कुठल्या माध्यमात गृहीत धरायचे? या प्रश्नावर तोडगा म्हणून विद्यार्थ्यांचे विद्यापीठांना त्यांच्या नियमात बदल करून विद्यार्थ्यांसाठी कोणत्यातरी एकाच माध्यमाचा पर्याय खुला ठेवता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना सध्या मिळत असलेले विषयानुसार माध्यम निवडण्याचे विद्यापीठ पातळीवरील स्वातंत्र्यही मिळणार नाही.
नागपूर विद्यापीठात परीक्षेसाठी अर्ज करताना विद्यार्थी ज्या माध्यमाचा उल्लेख करतो तेच माध्यम त्याच्या गुणपत्रिकेवर नमूद केले जाते, असे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांनी सांगितले. मात्र, अनेकदा विद्यार्थी अर्जावर इंग्रजी नमूद करत असले तरी परीक्षा मराठीतून देतात. या गोंधळामुळे मुंबई विद्यापीठ आपल्या गुणपत्रिकेवर माध्यमाचा उल्लेखच करीत नाही. अभियांत्रिकी, विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे काही विषय वगळता आम्ही जवळपास सर्वच विषयांच्या प्रश्नपत्रिका मराठीतून उपलब्ध करून देतो. पण, गुणपत्रिकेवर माध्यमाचा उल्लेख करीत नाही, असे मुंबई विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांनी सांगितले. नांदेड येथील रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये विधी अभ्यासक्रमाच्याबाबतीत माध्यमाचा प्रश्न येतो, त्यामुळे विधी शाखेच्या गुणपत्रकांवर शिकवण्याच्या माध्यमाचा उल्लेख केला जातो. मात्र, विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका कोणत्या माध्यमामध्ये लिहिली आहे, ते नमूद केले जात नाही, असे नांदेड विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. व्ही. के. भोसले यांनी सांगितले. सध्या गुणपत्रकावर माध्यमाचा उल्लेख नसला, तरी आता भविष्यात शिकवण्याच्या माध्यमाचा उल्लेख करण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे पुणे विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. बाळासाहेब नाईक यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्यांना त्यांच्या भाषेच्या माध्यमाचे प्रमाणपत्र दिले जाते. असे असले तरी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विषयानुसार माध्यमाचे प्रमाणपत्र देणे शक्य नसल्याचे आंबेडकर विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील उपकुलसचिव डी. एम. नेटके यांनी सांगितले.
या सगळ्या गोंधळामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या भाषेच्या माध्यमाची खातरजमा कशी करणार आणि त्याची अंमलबजावणी या परीक्षेपासून करता येणे व्यवहार्य आहे का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Story img Loader