पुणे : पवित्र संकेतस्थळामार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत आरक्षित गटातील उमेदवारांना खुल्या आणि आरक्षित अशा दोन्ही प्रवर्गांतील जागा उपलब्ध होणार आहेत. तसेच मुलाखतीसह पदभरती प्रक्रियेत उमेदवाराची एकापेक्षा जास्त पदांसाठी निवड झाल्यास व्यवस्थापनाला गुणवत्तेनुसार नियुक्ती देता येणार आहे. त्यामुळे कोणाचाही अधिकार डावलला जाणार नाही, तसेच पदेही रिक्त राहणार नसल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शिक्षण विभागाने या बाबत परिपत्रक प्रसिद्ध केले. शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीसह पदभरतीबाबतच्या सविस्तर सूचना व्यवस्थापनांना देण्यात आल्या आहेत. मात्र काही सूचनांना विपरित अर्थ लावून काही घटकांकडून अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. कोणत्याही आरक्षित प्रवर्गातील उमेदवार खुल्या गटातील जागांच्या निकषाची पूर्तता करत असल्यास त्याचा समावेश खुल्या जागेवर होणार आहे. उमेदवारांची नियुक्ती गुणवत्तेनुसार खुल्या जागेसाठी पात्र असल्यास खुल्या जागेवर, पात्र नसल्यास आरक्षित जागेवर होणार आहे. २०१९ मधील शिक्षक भरती प्रक्रियेत अशाच प्रकारे कार्यवाही करून भरती करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले.
हेही वाचा – साखर निर्यातीवरील निर्बंध कायम ? गरजेइतक्या साखर उत्पादनानंतर होणार इथेनॉल निर्मिती
हेही वाचा – पुणे : घर कामगाराकडून १८ लाखांचे दागिने लंपास, पाषाण परिसरातील घटना
मुलाखतीसह पदभरतीमध्ये १:१० या प्रमाणात उमेदवार मुलाखतीसाठी पाठवण्यात येत आहे. तसेच उमेदवारांना १० संस्थांचा पर्याय निवडण्याचा पर्याय आहे. उमेदवारांना १० प्राधान्यक्रम आणि संस्थांना १० उमेदवार उपलब्ध करून द्यायचे असल्याने शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची संख्या जागांच्या दहापट येणे अपेक्षितच नाही. तसेच झाल्यास एकूण उमेदवारांपैकी केवळ १० टक्के उमेदवार निवडले जातील, ९० टक्के उमेदवारांना या प्रक्रियेतून काहीही लाभ होणार नाही. पूर्वीच्या भरतीमध्येही अशीच कार्यपद्धती वापरण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.