लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) मोबाइल अॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक, प्रारुप प्रश्नपत्रिका-उत्तरपत्रिका, अन्य माहिती या अॅप्लिकेशनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालक, शिक्षक यांच्यासाठी हे अॅप्लिकेशन उपयुक्त ठरणार आहे.
गेल्या काही वर्षांत दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत समाजमाध्यमातून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. या चुकीच्या माहितीमुळे संभ्रम निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थी, पालक, शिक्षकांना नेमकी आणि अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी राज्य मंडळाच्या ‘एमबीएसएसई’ या मोबाइल अॅप्लिकेशनची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य मंडळाचे संकेतस्थळ असले, तरी सध्याच्या काळात मोबाइलचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. ही बाब लक्षात घेऊन स्वतंत्र मोबाइल अॅप्लिकेशन उपयुक्त ठरू शकते. गुगल प्ले स्टोअरवरून, राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरील दुव्याद्वारे अॅप्लिकेशन विनामूल्य डाऊनलोड करता येणार आहे, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.
आणखी वाचा-पुणे : तडीपारीची कारवाई कागदावरच; तडीपार गुन्हेगारांचा सर्रासपणे शहरात वावर
विद्यार्थी, पालक, शिक्षकांना दहावी, बारावीच्या परीक्षा, राज्य मंडळासंदर्भातील समाजमाध्यमांतील माहितीची सत्यासत्यता अॅप्लिकेशनद्वारे पडताळता येईल. या अॅप्लिकेशनवर दहावी-बारावीच्या परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक, गेल्या दोन वर्षांतील प्रारुप प्रश्नपत्रिका-उत्तरपत्रिका आणि अन्य सूचना, माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे हे अॅप्लिकेशन उपयुक्त ठरणार असल्याचेही गोसावी यांनी नमूद केले.
निकालही अॅप्लिकेशनवर…
राज्य मंडळाकडून दहावी, बारावीच्या परीक्षांचा संकेतस्थळावर जाहीर केला जातो. मात्र, आता हा निकाल येत्या काळात अॅप्लिकेशनद्वारेही देण्याचे नियोजन आहे, असेही गोसावी यांनी सांगितले.