पुणे जिल्ह्य़ात येत्या रविवारी (११ जानेवारी) दोन प्रकारे पक्ष्यांची गणना केली जाणार आहे. पाणथळ ठिकाणी आढळणाऱ्या पक्ष्यांची गणना वन विभागातर्फे केली जाणार आहे, तर एचएसबीसी बँक आणि युहिना संस्थांतर्फे ‘बर्ड रेस’ या उपक्रमांतर्गत पुण्यात किती प्रकारचे पक्षी दिसतात याची पाहणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे पक्षिप्रेमींना या उपक्रमात सहभागी होण्याची संधीसुद्धा मिळणार आहे.
वन विभागातर्फे दर वर्षी पाणथळ परिसरातील पक्ष्यांची गणना केली जाते. पुणे जिल्ह्य़ात पक्ष्यांचा वावर असलेल्या अशा प्रकारच्या अनेक जागा आहेत. त्यापैकी ११ ठिकाणे निवडून तेथे पाणथळ पक्ष्यांची गणना केली जाणार आहे. त्यासाठी वन विभागाने विविध संस्थांची मदत घेतली आहे. त्यांना फजनी जलाशयातील कुंभारगाव, भिगवण, वडगाव-मावळ, मुळा-मुठा पक्षी अभ्यारण्य, खडकवासला अशी वेगवेगळ्या ठिकाणांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या उपक्रमात हौशी पक्षिनिरीक्षक किंवा पक्षिप्रेमीसुद्धा सहभागी होऊ शकतात. त्यासाठी वन विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन पुण्याचे उपवनसंरक्षक सत्यशील गुजर यांनी केले आहे. याशिवाय पक्षिनिरीक्षक त्यांच्या त्यांच्या पद्धतीने पक्ष्यांची गणना करून त्याची माहिती वन विभागाला देऊ शकतात, असेही गुजर यांनी सांगितले.
याचबरोबर एचएसबीसी बँक आणि युहिना संस्था यांच्यातर्फे ‘बर्ड रेस’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत पुण्याच्या परिसरात किती प्रकारचे पक्षी आढळतात याची पाहणी केली जाणार आहे. पुणे शहर, परिसरातील शेती, तळी-पाणथळी, वेगळ्या प्रकारची वने आणि मानवी वस्तीत किती व कोणत्या प्रकारचे पक्षी आढळतात हे त्याद्वारे निरीक्षण केले जाणार आहे. हा उपक्रम गेली सात वर्षे हाती घेण्यात आला होता. त्याद्वारे शहरातील पक्ष्यांच्या प्रजातींची संख्या कमी होते आहे की वाढते आहे हे लक्षात येईल. पक्ष्यांची आणि पर्यावरणाची सद्यस्थिती का आहे हेही समजेल, अशी माहिती या उपक्रमातील सहभागी सारंग पाटील यांनी दिली.
‘दोन्ही उपक्रम पूरक’
‘‘पक्ष्यांच्या गणनेबाबतचे दोन्ही उपक्रम एकाच दिवशी होणार आहेत. ते एकमेकांसाठी पूरक ठरतील. त्यामुळे पक्ष्यांबाबत अधिक व्यवस्थित माहिती मिळेल.’’
– सत्यशील गुजर, उपवनसंरक्षक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा