पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र राज्य मंडळाकडून २२ जानेवारी रोजी ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार असून, कनिष्ठ महाविद्यालयांनी कोणतेही शुल्क न घेता प्रवेशपत्राची प्रत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य मंडळाच्या सचिव डॉ. अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत लेखी परीक्षा होणार आहे, तर तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ ते २० फेब्रुवारी या दरम्यान घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाकडून २२ जानेवारीपासून प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे.

राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, कनिष्ठ महाविद्यालयांनी कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता प्रवेशपत्राची प्रत डाऊनलोड करून त्यावर प्राचार्यांचा शिक्का मारून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहे. प्रवेशपत्रात विषय, माध्यमाबाबत बदल असल्यास त्याच्या दुरुस्त्या शाळा- कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यायच्या आहेत.

हेही वाचा : लोकपाल नियुक्तीकडे विद्यापीठांचे दुर्लक्ष; यूजीसीकडून ४२१ विद्यापीठांची यादी प्रसिद्ध

प्रवेशपत्रावरील विद्यार्थ्याचे नाव, छायाचित्र, स्वाक्षरी या बाबतच्या दुरुस्त्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे. छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचे छायाचित्र चिकटवून प्राचार्यांनी त्यावर शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे. प्रवेशपत्र गहाळ झाल्यास शाळा-महाविद्यालयांनी पुन्हा प्रवेशपत्राची प्रत घेऊन त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा मारून ती विद्यार्थ्यांना द्यायची आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hsc exam admit card will be available for students pune print news ccp 14 pbs