मतदानाच्या दिवशी (१५ ऑक्टोबर) होणारा बारावीचा पेपर राज्यमंडळाने पुढे ढकलला असून, तो आता २० ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. १४ आणि १६ ऑक्टोबरला होणारे पेपर मात्र त्याच दिवशी होणार आहेत.
राज्यात विधानसभेसाठी १५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी राज्यमंडळाची शिक्षणशास्त्र आणि इंग्रजी साहित्य या विषयांची बारावीची परीक्षा होती. ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. २० ऑक्टोबरला सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत शिक्षणशास्त्र विषयाची, तर दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत इंग्रजी साहित्य विषयाची परीक्षा होणार आहे. शिक्षणशास्त्र या विषयाच्या परीक्षेला २२० विद्यार्थी, तर इंग्रजी साहित्य विषयाची परीक्षा ८ विद्यार्थी देणार आहेत. मात्र, शाळांच्या मागणीनुसार १४ आणि १६ ऑक्टोबरच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आलेले नाही.
याबाबत राज्यमंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सांगितले, ‘मतदानाच्या आदल्या दिवशी दुपारी दीड वाजता पेपर संपत आहे. मुख्य विषयाच्या परीक्षा मतदानापूर्वीच होत आहेत. त्याचप्रमाणे या परीक्षांसाठी विद्यार्थीसंख्या कमी असते. त्यामुळे आदल्या आणि नंतरच्या दिवसाची परीक्षा पुढे ढकलण्याची आवश्यकता नाही.’