राज्यातील बारावीच्या परीक्षांवर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले आहे. मात्र, परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होतील, असे राज्यमंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.
राज्यातील बारावीच्या परीक्षांवर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांसाठी बहिष्कार टाकला आहे. मात्र, त्यामुळे परीक्षांच्या नियोजित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल होणार नाही, असे राज्यमंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सांगितले.
मम्हाणे म्हणाले, ‘‘शिक्षकांच्या मागण्या या धोरणात्मक आहेत. त्याबाबत शासनस्तरावर निर्णय होणे अपेक्षित आहे. शिक्षकांच्या संघटनेशी शासनाकडूनही आणि बोर्डाच्या माध्यमातूनही बोलणी सुरू आहेत. शिक्षकांनाही विद्यार्थ्यांचे नुकसान व्हावे असे वाटत नाही. त्यामुळे बहिष्काराचा तिढा लवकरच सुटेल. ६ ते १८ फेब्रुवारी प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा तर २० फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा होणार आहेत. परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होतील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी चिंता करू नये.’’
शिक्षणमंडळाच्या विभागीय अध्यक्षांची आणि सचिवांची मंगळवारी (४ फेब्रुवारी) बैठक होणार आहे. शिक्षकांच्या बहिष्काराबाबत तोडगा निघाला नाही, तर पर्यायी व्यवस्थेचा विचार या बैठकीत होणार आहे.
गैरमार्गाशी लढा अधिक कडक
गैरमार्गाशी लढा अभियान या वर्षी अधिक कडक करण्यात येणार आहे. भरारी पथकांची संख्या वाढवणे, परीक्षा केंद्र आणि भरारी पथके यांच्यात समन्वय साधणे यांबाबत विभागीय अध्यक्षांच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे.

Story img Loader