बारावीच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा अवघ्या पाच दिवसांवर आलेल्या असतानाही अजूनही मुंबई, पुणे विभागातील अनेक विद्यार्थ्यांच्या हाती परीक्षेची प्रवेशपत्रे पडलेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. विद्यार्थ्यांना सोमवापर्यंत प्रवेशपत्रे मिळतील, असा खुलासा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून शनिवारी सांगण्यात आले आहे.
बारावीच्या परीक्षांवर शिक्षकांच्या बहिष्काराची टांगती तलवार असतानाच आता प्रवेशपत्रे न मिळाल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. राज्यात बारावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा गुरुवारपासून (६ फेब्रुवारी) सुरू होत आहेत. मात्र, मुंबई आणि पुणे विभागातील अनेक विद्यार्थ्यांना अजूनही परीक्षेचे प्रवेशपत्र मिळालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तणावात नवीनच भर पडली आहेत.
या वर्षी परीक्षेच्या अर्जामध्ये राज्यमंडळाने बदल केले होते. परीक्षेच्या अर्जाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची अधिक तपशिलात माहिती गोळा करण्यात आली. त्याचबरोबर प्रवेशपत्रांचे काम करणारा कंत्राटदारही नवा असल्यामुळे प्रवेशपत्रे तयार होण्याला थोडा वेळ लागत आहे, अशी माहिती राज्यमंडळातील कर्मचाऱ्यांनी दिली. प्रवेशपत्रांचा पाठपुरावा आम्ही करत आहोत. पुण्यातील महाविद्यालयांकडे प्रवेशपत्रे पाठवलेली आहेत. मुंबईचेही काम सुरू आहे. सोमवापर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे मिळतील, असे राज्यमंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सांगितले.
प्रवेशपत्रे न मिळाल्यामुळे बारावीचे विद्यार्थी हवालदिल
बारावीच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा अवघ्या पाच दिवसांवर आलेल्या असतानाही अजूनही मुंबई, पुणे विभागातील अनेक विद्यार्थ्यांच्या हाती परीक्षेची प्रवेशपत्रे पडलेली नाहीत.
First published on: 02-02-2014 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hsc hall ticket students tension