पुणे विभागाचा बारावी परीक्षेचा (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा) निकाल ८१.९२ टक्के लागला असून, पुणे विभागात नगर जिल्ह्य़ाचा निकाल सर्वाधिक लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारीमध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. पुणे विभागामधून या परीक्षेसाठी २ लाख ९ हजार ६३९ नियमित विद्यार्थी बसले होते. पुणे विभागामध्ये येणाऱ्या पुणे, नगर आणि सोलापूर या जिल्ह्य़ांपैकी नगर जिल्ह्य़ाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. नगर जिल्ह्य़ाचा निकाल ८७.७५ टक्के, पुणे जिल्ह्य़ाचा ८१.९२ टक्के आणि सोलापूर जिल्ह्य़ाचा ७४.७७ टक्के लागला आहे. विभागामध्ये या वर्षी २४ हजार ३५२ पुनर्परीक्षार्थी होते. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण २९.०७ आहे. नियमित आणि पुनर्परीक्षार्थी मिळून विभागाचा एकूण निकाल ७५.७७ टक्के लागला आहे.
या वर्षीही विभागात मुली आघाडीवर असून ८७.३१ टक्के मुली आणि ७७.७२ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. विभागाचा विज्ञान शाखेचा निकाल ९०.७८ टक्के, कला शाखेचा निकाल ७२.२४ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ७७.८६ टक्के, तर किमान कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रमाचा (एमसीव्हीसी) निकाल ९२.९६ टक्के लागला आहे. पुणे विभागातील ८१ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे, तर शून्य टक्के निकाल लागलेल्या १० शाळा आहेत.
पुणे विभागामध्ये ‘गैरमार्गाशी लढा’ अभियान या वर्षी अयशस्वी ठरल्याचे दिसत आहे. २००९ ते २०१३ या पाच वर्षांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक गैरप्रकार या वर्षी नोंदवण्यात आले आहेत. या वर्षी पुणे विभागामध्ये ५४८ गैरप्रकारांची नोंद झाली आहे. २००९ मध्ये ३५९, २०१० मध्ये २५७, २०११ मध्ये ३३३ आणि २०१२ मध्ये २१७ गैरप्रकार झाले आहेत.
 २२४ विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
पुणे विभागातील २२४ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. महाविद्यालयांकडून अंतर्गत मूल्यमापनाचे गुण पाठवण्यात आले नसल्यामुळे निकाल राखून ठेवण्यात आल्याची शक्यता असल्याचे पुणे विभागाच्या सचिव पुष्पलता पवार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना ६ जूनपर्यंत त्यांचा निकाल मिळेल, असेही पवार म्हणाल्या. महाविद्यालयाने गुण पाठवूनही निकाल राखून ठेवले असल्याचे या विद्यार्थ्यांच्या पालकांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा