बारावीच्या परीक्षेमध्ये राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी नव्वदच्या पुढे गेली असतानाच पुणे विभागातील निकालाच्या टक्केवारीनेही पहिल्यांदाच टक्केवारीची नव्वदी ओलांडली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत यंदा पुणे विभागातून नव्याने परीक्षेस बसलेले ९०.७३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागातील पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्य़ांमध्ये अहमदनगर जिल्हय़ात सर्वाधिक ९२.५८ टक्के निकाल लागला. सुधारित अभ्यासक्रमानुसार अंतर्गत मूल्यमापनाच्या शाळेकडील २० टक्के गुणांचा फायदा विद्यार्थ्यांना मिळाल्याने निकालाची टक्केवारी वाढली आहे.
शिक्षण मंडळाच्या वतीने दुपारी एकच्या सुमारास संकेतस्थळावरून बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर विभागीय अध्यक्ष सुनील चौहान व सचिव पी. एस. पवार यांनी पुणे विभागातील निकालाची आकडेवारी जाहीर केली. मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेमध्ये नव्याने २ लाख २ हजार ५१० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यातील १ लाख ८३ हजार ७३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुणे विभागातही उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक आहे. पुणे विभागातून १ लाख १४ हजार ६०५ मुलांनी परीक्षा दिली. त्यातील ७८. ६५ टक्के मुले उत्तीर्ण झाले. परीक्षा दिलेल्या ८७ हजार ९०५ मुलींपैकी ८३ हजार २८१ मुली उत्तीर्ण झाल्या. त्यामुळे उत्तीर्ण होणाऱ्या मुलींची टक्केवारी ९४.७४ टक्के इतकी आहे.
जिल्हानिहाय निकालामध्ये अहमदनगर जिल्ह्य़ातील टक्केवारी पुणे विभागात सर्वाधिक आहे. अहमदनगर विभागामध्ये ५३ हजार ६५१ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यातील ४९ हजार ६६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे जिल्ह्य़ाची टक्केवारी ९२.५८ इतकी झाली. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्य़ात ९०. ४९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे जिल्ह्य़ात १ लाख ५ हजार ३८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ९५ हजार ३६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सोलापूर जिल्ह्य़ामध्ये ४३ हजार ४७१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील ८९.०२ टक्के म्हणजे ३८ हजार ७०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यंदाच्या परीक्षेत पुनर्परीक्षार्थीची संख्या २० हजार ६६६ होती. त्यापैकी ३१.१९ टक्के म्हणजे ६ हजार ४४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नियमित व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ८५.२१ टक्के आहे.
शंभर टक्के निकालाच्या सर्वाधिक शाळा
बारावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल लावणाऱ्या शाळांची परंपरा यंदाही कायम आहे. राज्यामध्ये ७७८ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यात पुणे विभागातील १६८ शाळांचा समावेश आहे. त्यामुळे शंभर टक्के निकाल लावणाऱ्या शाळांमध्ये पुणे विभाग आघाडीवर आहे. कोकण विभागाची टक्केवारी राज्यात सर्वाधिक असली, तरी शंभर टक्के निकाल लावणाऱ्या शाळा या विभागात सर्वात कमी आहेत. शंभर टक्के बरोबरच राज्यात दहा शाळांमध्ये शून्य टक्के निकाल लागला आहे. त्यात औरंगाबाद विभागातील चार, मुंबई विभागातील दोन, तर लातूर विभागातील चार शाळांचा समावेश आहे.
विज्ञानाचे विद्यार्थी आघाडीवर
राज्यातील निकालाप्रमाणे पुणे विभागातही विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली आहे. सर्वाधिक विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेतून परीक्षा दिली असून, याच शाखेतील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागात ८१ हजार ९९ विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ७६ हजार ६१९ म्हणजेच ९४. ४८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेच्या ५२ हजार ५३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ४७ हजार ८१२ म्हणजे ९१.३४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेच्या ५९ हजार ९१५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ८५.३१ टक्के म्हणजे ७६ हजार ६१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
जिल्हानिहाय निकाल
– अहमदनगर- ९२.५८ टक्के
– पुणे- ९०.४९ टक्के
– सोलापूर- ८९.०२ टक्के
पुणे विभागाचा मागील निकाल
– २०१३- ७५.७७ टक्के
– २०१२- ७५.७४ टक्के
– २०११- ७३.५९ टक्के
– २०१०- ७७. २० टक्के
– २००९- ८१.८५ टक्के
– २००८- ८९.७२ टक्के
– २००७- ७१.०९ टक्के
पुणे विभागाच्या निकालानेही टक्केवारीची नव्वदी ओलांडली
बारावीच्या परीक्षेमध्ये राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी नव्वदच्या पुढे गेली असतानाच पुणे विभागातील निकालाच्या टक्केवारीनेही पहिल्यांदाच टक्केवारीची नव्वदी ओलांडली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-06-2014 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hsc result pune zone