पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सध्या हवेच्या प्रदूषणात वाढ झाली असून, वाकडसह पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत जेथे नवी बांधकामे आणि मेट्रो आणि इतर विकासकामे सुरू आहेत, तेथे हवेची गुणवत्ता घसरली आहे. या सगळ्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पुणे परिसरात अनेक ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्पांची बांधकामे सुरू आहेत. त्याच वेळी मेट्रोचे कामही सुरू आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ साचते. त्यात खराब रस्त्यांमुळे निर्माण होणाऱ्या धुळीची भर पडते. धूलिकण श्वसनमार्गात गेल्याने निरोगी व्यक्तीलाही त्रास होऊ शकतो, अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांची मागणी
वाकड भागात हवा प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे. या परिसरात सध्या गृहप्रकल्पांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या प्रकल्पांना काँक्रीटचा पुरवठा करण्यासाठी अनेक रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्प याच परिसरात आहेत. हे प्रकल्प प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याचा आरोप आहे. वाकड परिसरातील नागरिकांनी हवा प्रदूषण कमी करण्याच्या मागणीसाठी मध्यंतरी मोर्चाही काढला.
प्रदूषण मंडळाची कारवाई
प्रदूषणाच्या तक्रारींनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने चार प्रकल्प बंद केले. पण, हवा प्रदूषणाची समस्या कमी झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण करणाऱ्या आरएमसी प्रकल्पांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून, आठवडाभरात दोन आरएमसी प्रकल्पांना नोटिसा बजावल्या. या प्रकल्पांच्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्यात आलेली नाही, तसेच मंडळाने प्रकल्प चालविण्यास मंजुरी देताना घातलेल्या अटींचे पालनही न केल्याचे मंडळाने म्हटले आहे.
विकासकांची भूमिका काय?
याबाबत नरेडको पुणेचे अध्यक्ष भरत अगरवाल म्हणाले, ‘हवा प्रदूषणास कारणीभूत होणारी धूळ नेमकी कोठून येते, हे आधी तपासण्याची आवश्यकता आहे. बांधकाम प्रकल्पांसह मेट्रोचे काम आणि खराब रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होत आहे. प्रत्येक बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी काँक्रीट तयार करावयाचे झाल्यास तेथे वाळू आणि खडी आणावी लागेल. यातून प्रदूषणात आणखी भर पडेल. याऐवजी रेडी मिक्स काँक्रीट प्रकल्पात एकाच ठिकाणी काँक्रीट तयार होते. त्यामुळे सर्व प्रकल्पांच्या ठिकाणी होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होते. केवळ रेडी मिक्स काँक्रीट प्रकल्पांवर कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही. याऐवजी एका भागात असे किती प्रकल्प असावेत, यावर मर्यादा घालावी. तसेच, या प्रकल्पांच्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण उपाययोजना काटेकोरपणे राबवाव्यात.’
आरोग्यावर गंभीर परिणाम
धुळीमुळे वाढलेल्या हवा प्रदूषणाचे गंभीर परिणाम आरोग्यावर होत आहेत. याबाबत ससून सर्वोपचार रुग्णालयातील श्वसनविकार विभागाचे प्रमुख डॉ. संजय गायकवाड म्हणाले, ‘हवेतील धूलिकण श्वसनामार्गे शरीरात जातात. आधीपासून दम्यासह श्वसनविकार असलेल्या रुग्णांना यामुळे जास्त त्रास होऊन त्यांचा आजार बळावतो. त्याचबरोबर निरोगी व्यक्तींवरही हवा प्रदूषणाचे दीर्घकालीन परिणाम होतात. सततच्या हवा प्रदूषणामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे जास्त धूळ असलेल्या भागांत राहणाऱ्या आणि तिथून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने उपाययोजना करायला हव्यात.’
रेडी मिक्स काँक्रीट प्रकल्पांना हवा प्रदूषण केल्याप्रकरणी नोटीस बजाविण्यात येत आहे. हे प्रकल्प बंद का करू नयेत आणि त्यांचा वीज व पाणीपुरवठा बंद का करू नये, अशी विचारणा करण्यात आली आहे. या नोटिशीला उत्तर न दिल्यास कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलले जाईल. -जगन्नाथ साळुंखे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
पुण्यातील हवेची गुणवत्ता
भाग | हवा गुणवत्ता निर्देशांक | हवेची गुणवत्ता |
भोसरी | १२२ | मध्यम |
भूमकरनगर वाकड | १०४ | मध्यम |
हडपसर | १०५ | मध्यम |
कात्रज डेअरी | ९६ | समाधानकारक |
कर्वे रस्ता | ९२ | समाधानकारक |