इंदापूर :  इंदापूर तालुक्यातील प्राचीन मंदिराचा वारसा सांगणाऱ्या श्री. पळसनाथ मंदिरामध्ये शिवभक्त – भाविकांनी महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी आज सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. आज सकाळपासूनच भाविकांनी श्री पळसनाथ मंदिरामध्ये रांगा लावून महादेव शिवलिंगाच्या दर्शनाचा लाभ घेतला.  गतवर्षी उजनी धरणाच्या निर्मितीनंतर दुष्काळाने उजनी धरण आटल्याने सेचाळीस वर्षांपूर्वी पुनर्वसित झालेल्या अनेक गावाच्या पाऊलखुणा स्पष्ट उघड्या पडू लागल्या होत्या.त्यामध्ये प्राचीन श्री. पळसनाथाचे मंदिर पुर्णपणे खुले झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 एक हजार वर्षाचा प्राचीन इतिहास लाभलेले हे मंदिर  सेचाळीस वर्ष पाण्यात राहून आजही सुस्थितीत आहे. याच मंदिरातील शिवलिंगाची नवीन पुनर्वसित पळसदेव मध्ये बांधण्यात आलेल्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे .पुणे जिल्ह्यातील भाविक मोठ्या श्रद्धेने  पळसनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात.

हे मंदिर अवर्षणाच्या काळात उघडे पडल्यानंतर अनेक वास्तुशास्त्र अभियंते व कारागीर , इतिहासप्रेमी, विद्यार्थी,  भाविक ,पर्यटक , हौशी छायाचित्रकार,  पत्रकार या ठिकाणी आवर्जून भेट देतात. पळसदेव गावाला प्राचीन समृद्ध इतिहास आहे. हे गाव पुरातन काळातले असल्याने अनेक प्राचीन मंदिरे या गावांमध्ये अस्तित्वात होती. परंतु सन १९७५-७६ दरम्यान हे पळसदेव गाव उजनी धरणाच्या पाण्यामध्ये संपादित झालं .इंदापूर तालुक्यातील संपादित झालेल्या गावांपैकी सर्वात जास्त काळी कसदार सुपीक जमीन आणि हे प्राचीन शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुना असलेल्या अनेक मंदिरासह हे गाव धरणासाठी संपादित झालं. सेचाळीस वर्षापूर्वी हे गाव नवीन गावठाणा मध्ये पुनर्वसित झाले. परंतु आजही जुन्या गावातील वैभवशाली परंपरा असलेल्या प्राचीन पाऊलखुणा स्पष्टपणे दिसतात.

हजार वर्षापूर्वी हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेले श्री. पळसनाथ मंदिराचे शिखर  प्राचीन इतिहासाची साक्ष देत, आजही उजनी धरणाच्या पाण्यात गेली सेचाळीस वर्ष  पाण्याच्या असंख्य लाटांचे तडाखे खाऊन तग धरून उभा आहे .सप्तभुमिज पद्धतीचे हे शिखर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पळसदेव च्या पुलावरून उत्तर बाजूकडे पाहिले असता स्पष्ठ दिसते.

मंदिराच्या गर्भगृहामध्ये अत्यंत कोरीव काम, सभामंडप अत्यंत देखणी मांडणी आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले दगडी खांबावर उभा राहिलेले  हे प्राचीन मंदिर सेचाळीस वर्षापूर्वी पाण्याखाली गडप होऊन या मंदिराचे अर्धवट शिखर उघडे राहिले. मंदिराच्या भोवती असणाऱ्या ओवर्या व  इतर छोटी मंदिरे मंदिराच्या भोवतालचा तट पाण्याखाली गेला. परंतु हे मंदिर आजही तितक्याच दिमाखाने पाण्यामध्ये गेली सेचाळीस वर्ष उभे आहे.

या मंदिराच्या केलेल्या अभ्यासानुसार व या मंदिरामध्ये सापडलेल्या शिलालेखावरील उल्लेखानुसार हे मंदिर हजार वर्षाच्या आसपास बांधण्यात आले. त्यापासून या मंदिराचे मुख्य भागाला कोणत्याही प्रकारचे डागडुजी अथवा पुनर्बांधणी करण्याचा प्रसंग ग्रामस्थांवर आल्याची नोंद नाही. परंतु सेचाळीस वर्षापूर्वी हे मंदिर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात साठी संपादित झालं नवीन गावठाणा मध्ये ग्रामस्थांनी नवीन श्री. पळसनाथ मंदिर बांधले. परंतु जुन्या मंदिराला त्यातील  दगडालाही ग्रामस्थांनी हात लावला नाही.

 पळसदेव मध्ये बांधण्यात आलेले नवीन मंदिर नव्या धाटनीने बांधण्यात आले आहे.   केवळ महादेवाची  पिंड व नंदीची मूर्तीची नवीन मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गेल्या चार दशकाहून अधिक काळ हे मंदिर ऊन, वारा ,आणि पाऊस आणि पाण्याच्या लाटांचे तडाखे सोसत आजही तितक्याच दिमाखाने उभे आहे. हे मंदिर अवर्षणाच्या दिवसांमध्ये अधून मधून पूर्णपणे खुले होते . गेल्या वर्षी महाराष्ट्रातूनच नव्हे तर  देशभरातून पर्यटक ,वार्ताहर, पुरातन वास्तूप्रेमी, प्राचीन मंदिर अभ्यासक , विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती.

पळसनाथ मंदीराला क दर्जा द्या

पळसदेव येथील प्राचीन श्री. पळसनाथ मंदिराला तीर्थक्षेत्र व पर्यटन ‘क’ दर्जा देण्यात यावा .अशी मागणी निवृत्त पोलिस निरीक्षक जगन्नाथ काळे यांनी   केली आहे. पळसनाथाचे हे प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभलेले हजार वर्षांपूर्वीचे मंदिर आहे.  जुने मंदिर उजनी धरणाच्या पाण्यात जरी असले तरी ,देशातून मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक दरवर्षी येतात. सध्या श्री. पळसनाथ मंदिराच्या जवळच विश्वनाथाचे मंदिर पुनर्वसनाअभावी अद्यापही पाण्यात आहे .त्या मंदिरावर संपूर्ण रामायणातील प्रसंगातील चित्रे कोरलेले आहेत. श्री. पळसनाथ मंदिराला ‘क’ दर्जा प्राप्त झाल्यावर  मिळणाऱ्या निधीतून व सोई सवलतीतून विश्वनाथाच्या मंदिराचे पुनर्वसन करणे शक्य होईल. आणि सध्या नवीन श्री. पळसनाथ मंदिराच्या परिसरामध्ये भाविकांच्या सोयीसाठी विविध विकास कामे करता येतील. असेही श्री . जगन्नाथ काळे व ग्रामस्थांचे  म्हणणे आहे.