लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नामगजराने रविवारी देहूनगरी दुमदुमली. भजनी दिंड्यांनी रात्रभर केलेला जागर, काकडा आरती, महापूजा, हरिपाठ अन् वीणा, टाळ, मृदंग, चिपळ्यांची साथ अशा भक्तिमय वातावरणात रविवारी ३७५ वा बीज सोहळा झाला. दुपारी बारा वाजता नांदुरकीच्या वृक्षावर फुलांची उधळण करून आणि मनोभावे हात जोडत भाविकांनी इंद्रायणीच्या काठी भक्तिचैतन्य फुलविले.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे फाल्गुन कृष्ण द्वितीयेचाय दिवशी सदेह वैकुंठगमन झाले. त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. यंदाचा तुकाराम महाराजांचा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. देहूनगरीत या दिव्य सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी दाखल झाले होते.

पहाटे चार वाजता मुख्य देऊळवाड्यात काकडारती झाली. साडेपाच वाजता देऊळवाड्यातील विठ्ठल-रुक्मिणी पूजा, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरातील महापूजा आणि वैकुंठगमन स्थान येथील पूजा संस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे आणि विश्वस्त यांच्या हस्ते झाल्या. प्रांत अधिकारी यशवंत माने, तहसिलदार जयराज देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, विश्वस्त माणिक महाराज मोरे, संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, अजित महाराज मोरे, विशाल महाराज मोरे या वेळी उपस्थित होते.

सकाळी दहा वाजता हरीनामच्या गजरात पालखीचे वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान झाले. त्यानंतर वैकुंठगमन सोहळ्यात बापूसाहेब देहूकर महाराजांचे वैकुंठगमन प्रसंगावर कीर्तन झाले. ‘घोटविन लाळ ब्रम्हज्ञान्या हाती । मुक्ता आत्मस्थिती सोडविन’ या अभंगावर आधारित कीर्तन झाले. फडकरी, वारकरी, मानकरी यांचा सत्कार झाला. साडेअकरा वाजता पालखीची वैकुंठगमन मंदिराला प्रदक्षिणा झाली. दुपारी बारापर्यंत तुकोबारायांच्या आणि विठ्ठलाच्या नामाचा गजर झाला. बारा वाजता नांदुरकीच्या वृक्षावर फुलांची उधळण करून, मनोभावे हात जोडत भाविकांनी इंद्रायणीच्या काठी भक्तिचैतन्य फुलविले. दुपारी साडेबारा वाजता वैकुंठस्थान येथून पालखीचे मुख्य देऊळवाड्यातील मंदिराकडे आगमन झाले. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. अडीच लाखांहून अधिक भाविक बीज सोहळ्याला उपस्थित होते.

कडेकोट पोलीस बंदोबस्त

मंदिर परिसराच्या दोन्ही बाजूंना फेरीवाले, पथारीवाले यांना प्रतिबंध करण्यात आला होता. मंदिर आवारात त्रिस्तरीय सुरक्षाव्यवस्था तैनात होती. कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. देहूत प्रवेश करणाऱ्या मार्गावर सुरक्षा कठडे लावले होते. गावात वाहनांना प्रवेश बंद केला होता.