वर्षाविहारासाठी पुणे-मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या भागातील पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळा, खंडाळा परिसरात दाखल झाल्याने वाहतूक कोंडी झाली. कोंडीमुळे पर्यटकांसह स्थानिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.
वर्षाविहारासाठी पुणे, मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या भागातील पर्यटक लोणावळा, खंडाळा परिसरात येतात. शनिवारी आणि रविवारी पर्यटकांची गर्दी वाढते. सलग सुट्ट्या आल्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढते. त्यामुळे शहरातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गासह ठिकठिकाणी कोंडी होते. शनिवारी (२ जुलै) मोठ्या संख्येने पर्यटक दाखल जाल्याने वाहतूक कोंडी झाली. पाच ते दहा मिनिटांचे अंतर कापण्यासाठी अर्धा ते पाऊण तास वेळ लागत होता. मोटारींच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. गर्दी वाढल्याने व्यवसाय वाढतो, असा स्थानिक दुकानदारांचा अनुभव आहे. मात्र, दुकानासमोर मोटार तसेच दुचाकी लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने दुकानात खरेदीसाठी फारशी गर्दी नसल्याचे दुकानदारांनी सांगितले.
कोंडीमागची कारणे –
रखडलेल्या पुलाची कामे, जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले रुंदीकरण, अवजड वाहनांच्या शहरातील प्रवेश बंदीची अंमलबजावणी होत नसल्याने लोणावळा परिसरात कोंडी होत आहे. लोणावळा परिसरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे आहेत. अतिक्रमणांमुळे कोंडीत भर पडत आहे. सलग सुट्टया आल्यास शहरात ठिकठिकाणी कोंडी होते. स्थानिक नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड होते, अशा तक्रारी स्थानिकांकडून करण्यात आल्या.