पुणे : जिल्ह्यातील प्राचीन वास्तू, गड-किल्ले संवर्धन, ऐतिहासिक, तसेच धार्मिक स्थळे यांच्या विकासाला सन २०२३-२४ मध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनास मोठ्या प्रमाणात चालना मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्या दृष्टीने जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून नियोजनही करण्यात येत आहे.
छत्रपती श्री संभाजीमहाराज यांचे हवेली तालुक्यातील बलिदान स्थळ मौजे तुळापूर आणि शिरूर तालुक्यातील समाधिस्थळ वढू (बु.) येथील २६९ कोटी २४ लाख रुपयांच्या विकास आराखड्यातील कामांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. छत्रपती श्री संभाजीमहाराज पुण्यतिथीच्या दिवशी विकास आराखड्याची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आली असून, दोन्ही कामे छत्रपती संभाजीमहाराजांच्या जयंतीपूर्वी (१४ मे) सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
हेही वाचा >>> अंशदान घेऊन पतसंस्थांमधील ठेवींना संरक्षण?, राज्य सरकारकडून लवकरच घोषणा
श्रीक्षेत्र जेजुरी विकास आराखड्यांतर्गत १०९ कोटी ५७ लाखांच्या विकास आराखड्यातील कामांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुख्य मंदिराचे जतन-संवर्धनाच्या कामाच्या निविदेने विकास आराखड्यास सुरुवात करण्यात येत आहे. मावळ तालुक्यातील मौजे सदुंबरे येथील श्री संत जगनाडेमहाराज विकास आराखड्यासही मंजुरी देऊन शासन मान्यतेसाठी विभागीय आयुक्तालयास ६२ कोटी ९३ लाख रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> पुणे: उमेदवारांचा डेटा सुरक्षित, प्रश्नपत्रिका मिळवणे अशक्य
दरम्यान, अष्टविनायक विकासाचा ४३ कोटी २३ लाख रुपयांचा आराखडा मुख्य सचिवांच्या मंजुरीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू स्मारक विकास आराखडा सुधारित करून शासनास सादर करण्याचे काम करण्यात येत आहे. देशातील क्रांतिकारकांच्या असीम त्यागाचे स्थान सर्वांना प्रेरणा, स्फूर्ती देणारे असावे आणि ते राष्ट्रीय स्तरावरील प्रेरणा केंद्र व्हावे यासाठी किमान २०० कोटींचा आराखडा तयार करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांनी दिली.
ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची कामे पुरातत्त्व विभागामार्फत करताना मूळ वास्तू आणि प्राचीन शैली यांच्याशी साधर्म्य असणारी कामे दिसतील, याकडे लक्ष दिले जाईल. गड आणि किल्ले ही राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीके असल्याने हा इतिहास जतन करून ठेवण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच या कामांमुळे जिल्ह्यातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे.