वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये पडलेली हजारो बेवारस वाहने ही पुणे पोलिसांच्या दृष्टीने मोठी डोकेदुखी ठरली आहेत. बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्याची किंवा लिलाव करण्याची प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशाने राबविण्यात येते. मात्र वाहनांच्या विल्हेवाटीबाबत पोलीस आणि ज्यांचे वाहन चोरीला गेले आहे अशांकडून ठोस पाठपुरावा होत नसल्यामुळे बेवारस वाहनांचा शहरातील विविध पोलीस ठाण्यात अक्षरश: खच पडला आहे. या वाहनांमुळे पोलीस ठाण्यांमध्ये अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ३९ पोलीस ठाणी आहेत. पोलीस ठाण्यांच्या आवारात फेरफटका मारला तर ठाण्याच्या मोकळ्या जागेत बेवारस वाहने तसेच विविध गुन्ह्य़ांत जप्त करण्यात आलेली दुचाकी आणि चारचाकी वाहने मोठय़ा संख्येने पडून असल्याचे पाहायला मिळते. या वाहनांच्या नजीक साठणारा कचरा ही देखील पोलिसांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात दुचाकी व चारचाकी अशी शेकडो वाहने पडून आहेत. पुणे शहर परिसरात दररोज दोन-तीन वाहन चोरीचे गुन्हे घडतात. चोरटे वाहन चोरल्यानंतर त्याचा वापर गुन्हय़ांसाठी करतात. काही दिवसांपूर्वी ठाणे शहरात घडलेल्या एका गंभीर गुन्ह्य़ात वापरलेली दुचाकी पिंपरी भागातून चोरल्याचे निष्पन्न झाले होते.

चोरटे दुचाकी वाहन चोरल्यानंतर ते पेट्रोल संपेपर्यंत वापरतात. पेट्रोल संपल्यानंतर वाहन रस्त्याच्या कडेला सोडून चोरटे पसार होतात. शेवटी रस्त्याच्या कडेला धूळ खात पडलेली अशी वाहने उचलून ती पोलीस ठाण्यात आणली जातात. दरम्यान, ज्यांचे वाहन चोरीला जाते ते देखील पोलिसांकडे जात नाहीत किंवा तक्रार देत नाहीत. वाहनचालकांकडून पाठपुरावा केला जात नसल्याने शेवटी अशी वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात पडून राहतात. न्यायालयाच्या आदेशानंतर अशा वाहनांची विल्हेवाट लावली जाते किंवा वाहन मूळ मालकाच्या ताब्यात दिले जाते, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

वाहने लिलावात

* बेवारस वाहने पोलीस ठाण्यात आणल्यानंतर वाहन मालकांना आवाहन केले जाते.

* मूळ मालकाने पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर त्याला ओळख पटवणारी कागदपत्रे सादर करावी लागतात.

* न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर पोलीस मूळ मालकाच्या हवाली वाहन करतात.

* ज्या वाहनांचे मालक तक्रार देण्यास किंवा वाहनांची ओळख पटविण्यास पुढे येत नाहीत, अशा वाहनांचा न्यायालयाच्या आदेशाने लिलाव करण्यात येतो.

* पोलीस ठाण्याच्या आवारात पडलेल्या अशा वाहनांची अवस्था खराब झालेली असते. वाहने सुस्थितीत नसतात. त्यामुळे ही वाहने लिलावातच काढली जातात.

Story img Loader