स्थानिक संस्था कराच्या विरोधात सर्व व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या बेमुदत बंदला शहरात सोमवारी सकाळपासून सुरुवात झाली. बंदमुळे शहरातील सर्व बाजारपेठांमधील व्यवहार ठप्प झाले असून मंगळवारी व्यापारी संघटनांतर्फे महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. एक दिवसांच्या लाक्षणिक बंदनंतर शहरातील पेट्रोल पंप मंगळवार (२ एप्रिल) पासून सुरू होतील.
राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे पुणे व पिंपरीत स्थानिक संस्था कराची (लोकल बॉडी टॅक्स – एलबीटी) आकारणी सुरू करण्यात आली असून पुणे व्यापारी महासंघासह, दि पूना मर्चंट्स चेंबर, पिंपरी व्यापारी महासंघ आणि
या शिवाय इतर अनेक छोटय़ा-मोठय़ा व्यापारी संघटनांनी या कराला विरोध केला आहे. हा कर जोवर हटत नाही, तोपर्यंत बेमुदत बंद पाळण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतला असून त्यानुसार या बंदला सोमवारी सकाळी सुरुवात झाली. व्यापारी संघटनांनी केलेल्या आवाहनानुसार बंदला शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. सर्व घाऊक बाजारपेठांमधील व्यवहार पूर्णत: बंद होते, तसेच किरकोळ विक्रीची दुकानेही बहुतांश बंद राहिली.
सारसबाग येथील श्री गणेश मंदिरात सकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ सराफी व्यावसायिक दाजीकाका गाडगीळ तसेच महासंघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, मुरलीभाई शहा, सूर्यकांत पाठक, फत्तेचंद रांका, महेंद्र पितळीया, हेमंत शहा, घनश्याम सुराणा यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. व्यापारी वर्गाची मोठी उपस्थिती या वेळी होती. जकात रद्द करण्याच्या नावाखाली एलबीटी हा नवा कर लागू करण्यात आला असून त्यातील अटी व तरतुदी अत्यंत जाचक व क्लिष्ट आहेत. व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याचाच हा प्रकार आहे. या कराला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध असल्याचे ओस्तवाल यांनी या वेळी सांगितले.
शहरात पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सोमवारी दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. बंद शांततेत पार पडला, अशी माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त एम. टी. तांबडे यांनी दिली. पुणे व पिंपरीत व्यापाऱ्यांनी केलेल्या निदर्शनांच्या वेळीही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही असेही सांगण्यात आले.
पूना मर्चंट्स चेंबरही सहभागी
एलबीटीसंबंधी पूना मर्चंट्स चेंबरची विशेष सर्वसाधारण सभा सोमवारी बोलावण्यात आली होती. इतर व्यापाऱ्यांप्रमाणेच लाक्षणिक बंदचे रूपांतर बेमुदत बंदमध्ये करण्याचा ठराव या सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. एलबीटी कायद्यास व्यापाऱ्यांचा पूर्णत: विरोध असून एलबीटी हटेपर्यंत बाजार बंद ठेवावा, असाही ठराव या वेळी मंजूर करण्यात आल्याचे चेंबरचे अध्यक्ष अजित सेटिया यांनी सांगितले.
उद्योगनगरीत कडकडीत बंद
राज्य शासनाने एक एप्रिलपासून एलबीटी लागू केल्याचे तीव्र पडसाद पिंपरी-चिंचवड शहरात उमटले. उद्योगनगरीतील व्यापारी व उद्योजकांनी शिवसेनेचे खासदार गजानन बाबर यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून एलबीटीच्या विरोधात आंदोलन केले. एलबीटी अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी शहर कडकडीत बंद ठेवून व्यापाऱ्यांनी आपला विरोध दर्शवला. तथापि,
पालिका प्रशासनाने मात्र एलबीटी अंमलबजावणी करण्याची ठाम भूमिका घेतली आहे.
निगडीतील भक्ती-शक्ती उद्यानापासून खासदार बाबर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीत चार ते पाच हजार व्यापारी सहभागी झाले होते. शहराच्या विविध भागातून फिरून दुपारी पालिका मुख्यालयासमोर रॅलीचे रूपांतर महामोर्चात झाले. या वेळी काळे झेंडे व काळ्या फिती लावलेल्या व्यापाऱ्यांनी ‘एलबीटी हटाव, व्यापारी बचाव’ घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. त्यानंतर निवडक व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना भेटले. खासदारांनी व्यापाऱ्यांची बाजू मांडली, तर आयुक्तांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली.
यासंदर्भात, बाबर म्हणाले, एलबीटीच्या अंमलबजावणीला व्यापारी वर्गाचा तीव्र विरोध आहे. आम्ही बेमुदत बंद करण्याच्या भूमिकेत आहोत. ‘न भूतो न भविष्यति’ असा प्रतिसाद व्यापाऱ्यांनी दिला आहे. एलबीटी मागे घेईपर्यंत व्यापाऱ्यांचे आंदोलन सुरू राहणार आहे. पुण्यातील मोर्चातही आम्ही सहभागी होणार आहोत.
राष्ट्रवादीच्या महापौर व आमदारांचा विरोध
राष्ट्रवादीचा समावेश असलेल्या लोकशाही आघाडी सरकारने एलबीटी लागू करण्याचा निर्णय घेतला असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आमदार विलास लांडे व त्यांच्या पत्नी, पिंपरीच्या महापौर मोहिनी लांडे यांनी एलबीटीला तीव्र विरोध केला आहे. खासदार बाबर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पिंपरीत काढण्यात आलेल्या मोर्चात आमदार लांडे सहभागी झाले व व्यापाऱ्यांच्या बाजूने जोरदार भाषणही ठोकले.