लाचखोरांना पकडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या टोल फ्री क्रमांक व मोबाईल अॅपला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे विभागाकडे टोल फ्री क्रमांकावर आतापर्यंत ९४३ जणांनी संपर्क साधला असून त्यापैकी सहा तक्रारींच्या अनुषंगाने लाचखोरांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. मोबाईल अॅपवर आलेल्या तक्रारींवरून चार कारवाया करण्यात आल्या आहेत.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक (अन्टी करप्शन ब्यूरो- एसीबी) विभागाचे अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांनी मंगळवारी ही माहिती दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाने गेल्या चार महिन्यात केलेल्या कारवाईची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. प्रधान यांनी सांगितले की, नागरिकांना तक्रार करणे सोपे व्हावे, या करिता एसीबीने अधिकृत मोबाईल अॅप व १०६४ हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. या दोन्ही उपक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तक्रार करण्यासाठी सुरू केलेले मोबाईल अॅप हे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असून त्यामध्ये संबंधित जिल्ह्य़ातील विभागाकडे तक्रार करण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच तक्रारी संदर्भातील काही चित्रीकरण व छायाचित्रेही या मोबाईल अॅपवर पाठविता येऊ शकतात.
राज्यात आतापर्यंत हेल्पलाईनवर पाच हजार १४१ नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामध्ये अनेक तक्रारींवरून कारवाई करण्यात आली आहे. पुणे विभागात ९४३ नागरिकांनी हेल्पलाईनवर संपर्क साधला आहे. त्यापैकी पाच लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. मोबाईल अॅपवर ५८ तक्रारी आल्या आहेत. त्यातील नऊ तक्रारी या अपसंपदेच्या संदर्भातील आहेत. पुणे विभागाकडे मोबाईल अॅपवर आलेल्या तक्रारींपैकी चार तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे, असे डॉ. प्रधान यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा