महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या हेतूने पिंपरी महापालिकेने सुरू केलेल्या पवनाथडी जत्रेत यंदा मोठा प्रतिसाद मिळाला. चार दिवस चाललेल्या पवनाथडीत तब्बल ७०० बचत गट सहभागी झाले आणि चार लाख नागरिकांनी त्यास भेट दिली. यामध्ये लाखोंची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.
पिंपरीतील एचए कंपनीच्या मैदानावर ४ ते ७ एप्रिलपर्यंत पवनाथडीचे आयोजन करण्यात आले होते, महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तेव्हा उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप, पक्षनेत्या मंगला कदम, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती भारती फरांदे, विधी समितीचे सभापती प्रसाद शेट्टी, शिक्षण मंडळाचे सभापती विजय लोखंडे, अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम आदी उपस्थित होते. खासदार शिवाजीराव आढळराव यांनीही जत्रेत भेट देऊन स्टॉलची पाहणी केली. गेल्या चार दिवसात पवनाथडीला प्रतिदिवशी जवळपास एक लाख नागरिकांनी भेट दिली, त्यामध्ये महिलांची संख्या अधिक होती. पवनाथडीच्या माध्यमातून लाखोंची उलाढाल झाली. पवनाथडीसारख्या उपक्रमातून महिला सक्षमीकरणाची चळवळ अधिक गतीमान होईल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.