दिवाळी खरेदीसाठी मध्यभागात रविवारी मोठी गर्दी झाली. सुट्टी असल्याने शहर तसेच उपनगरातील नागरिकांनी खरेदीसाठी लक्ष्मी रस्ता, मंडई, तुळशीबाग परिसरात गर्दी केल्याने वाहतूक विस्कळीत झाली.दिवाळीचा प्रारंभ शुक्रवारपासून (२१ ऑक्टोबर) होत आहे. सोमवारी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे. नरकचतुर्दशीच्या दिवशी नवीन कपडे परिधान करण्याची प्रथा आहे. रविवारी (१६ ऑक्टोबर) सुट्टी असल्याने खरेदीसाठी शहर तसेच उपनगरातील नागरिकांनी सकाळपासून मध्यभागातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, मंडई, शनिपार, तुळशीबाग परिसरात गर्दी केली होती. शिवाजी रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यावर खरेदीसाठी मोठ्या संख्येने नागरिक आले होते. त्यामुळे या भागातून चालणे देखील अवघड झाले होते. कोंडी आणि गर्दीतून वाट काढत नागरिकांनी खरेदी केली.रविवार पेठेतील बोहरी आळी, कापड गंज, मोती चौक, पासोड्या विठोबा मंदिर परिसरात सजावट आणि विद्युत रोषणाईचे साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती. अनेकजण मध्यभागात मोटारीतून खरेदीसाठी आले होते. मोटारी आणि दुचाकी वाहनचालक मोठ्या संख्येने रस्त्यावर आल्याने मध्यभागातील प्रमुख रस्त्यांसह गल्ली बोळातील वाहतूक विस्कळीत होऊन कोंडी झाली होती. कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोंडीमुळे खरेदीसाठी आलेले नागरिक आणि स्थानिक रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले.
हेही वाचा >>>पुणे : शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने नऊ लाखांचा गंडा ; महिलेच्या विरोधात गुन्हा
कोंडी सुटेना
दिवाळी खरेदीसाठी मध्यभागात मोठ्या संख्येने नागरिक खरेदीसाठी गर्दी करतात. गर्दीचे नियोजन तसेच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस नेमण्यात आले आहेत. मात्र, मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आल्याने वाहतुकीचे नियोजन करणाऱ्या पोलिसांची तारांबळ उडाली. वाहनांचे कर्णकर्कश हॅार्न, कोंडी, बेशिस्तपणे लावलेली वाहनांमुळे अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागले. कोंडी सोडविताना पोलीस हतबल झाले. महर्षी विट्टल रामजी शिंदे, नदीपात्रातील रस्त्यावर मोटारी, दुचाकी लावून अनेकजण सहकुटुंब खरेदीसाठी आले होते. मंडई, नारायण पेठेतील वाहनतळावर मोटारी लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने या भागात मोटारींच्या रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.