पुणे : पुण्यात जागतिक सुविधा केंद्रे (जीसीसी), माहिती तंत्रज्ञान (आयटी) उत्पादने आणि सेवा क्षेत्रासह बिगरतंत्रज्ञान क्षेत्रात नवीन रोजगाराच्या संधी चालू आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यामध्ये सायबर सुरक्षा आणि डेटा सायन्सच्या उमेदवारांना सर्वाधिक वेतन मिळेल, असा अंदाज टीमलीज डिजिटलने वर्तविला आहे.
टीमलीज डिजिटलच्या अहवालानुसार, पुण्यात जीसीसी, आयटी उत्पादने व सेवा आणि बिगरतंत्रज्ञान या तिन्ही क्षेत्रांत मोठी वाढ होत आहे. या क्षेत्रांमध्ये सायबर सुरक्षा, डेटा सायन्स आणि डेटा इंजिनिअर यांना सर्वाधिक मागणी आहे. यामुळे त्यांना अनुक्रमे प्रतिवर्ष वेतन १४.८ लाख, १४.८ लाख आणि ८.८ लाख रुपये मिळत आहे. डेव्हऑप्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा ॲनालिटिक्स आणि क्लाऊड कॉम्प्युटिंग यातील कर्मचाऱ्यांना प्रतिवर्ष वेतन ८.७ लाख ते ७.३ लाख रुपये मिळत आहेत.
हेही वाचा – घरांच्या किमतीतील वाढ सुरूच राहणार; क्रेडाई-कॉलियर्सचा अहवालातून नेमकं कारण समोर
सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कोडिंग, डिझायनिंग आणि सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणखी संधी उपलब्ध होतील. या क्षेत्रात नवीन प्रवेश करणाऱ्या उमेदवारांना जीसीसीमध्ये प्रतिवर्ष सरासरी वेतन ९.३७ लाख रुपये मिळेल. याचवेळी आयटी उत्पादने व सेवांमध्ये अशा उमेदवारांना प्रतिवर्ष वेतन ६.२३ लाख रुपये मिळेल आणि बिगर तंत्रज्ञान क्षेत्रात प्रतिवर्ष वेतन ६ लाख रुपये मिळेल, असे अहवालात म्हटले आहे.
आयटी पायाभूत सुविधांच्या सुरक्षेची जबाबदारी सायबर सुरक्षा आणि नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेशन या विभागांवर असते. जीसीसींकडून या विभागातील कर्मचाऱ्यांना प्रतिवर्ष सरासरी वेतन ९.७५ लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे. यातून कंपन्यांकडून सायबर सुरक्षेवर देण्यात येणारा भर समोर येत आहे. याचवेळी सायबर सुरक्षेसाठी आयटी उत्पादने व सेवांमध्ये प्रतिवर्ष वेतन ६.८३ लाख रुपये आणि बिगरतंत्रज्ञान क्षेत्रात प्रतिवर्ष वेतन ५.१७ लाख रुपये असेल, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जीसीसी आघाडीवर
जागतिक सुविधा केंद्रे (जीसीसी) तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन नोकरीच्या संधीसाठी आकर्षक वेतन देण्यात आघाडीवर आहे. जागतिक पातळीवरील निकषानुसार हे वेतन दिले जात आहेत. उच्च कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची गरज आणि स्पर्धात्मकता यामुळे जीसीसींकडून कर्मचाऱ्यांना चांगले वेतन दिले जात आहे. बिगरतंत्रज्ञान क्षेत्रात नवीन संधी वाढल्या असल्या तरी तुलनेने वेतन कमी आहे. आयटी क्षेत्रात या बाबतीत मध्यम पातळीवर असून, मनुष्यबळाची मागणी आणि वेतन यात समतोल साधला जात आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
जागतिक सुविधा केंद्रे (जीसीसी) रोजगाराच्या नवीन संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करीत आहेत. याचबरोबर त्यांच्याकडून दिले जाणारे वेतनही जास्त आहेत. सायबर सुरक्षा आणि डेटा ॲनालिटिक्स, टेस्टिंग आणि डेटा सायन्स यासाठी सर्वाधिक वेतन मिळत आहे. – मुनिरा लोलीवाला, उपाध्यक्षा, टीमलीज डिजिटल