जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्याजवळील वरसोली टोलनाका येथील फास्ट ट्रॅगचा सर्व्हर रात्री एक वाजल्यापासून बंद पडल्याने मध्यरात्रीपासून टोल नाक्यावरून गाड्या सोडण्यात आल्या नव्हत्या. यामुळे राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा आठ ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत गेल्या होत्या. सकाळच्या सत्रात शाळेत जाणाऱ्या सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना, दुग्ध व्यावसायिक, कामगार या सर्वांना या वाहतूक कोंडीचा फटका बसला.
हेही वाचा >>> पुणे : कर्वे रस्त्यावर कपड्याच्या दुकानाला आग
वाहने जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे अनेकांना शाळेत जाता आले नाही. इयत्ता दहावीच्या सराव पेपर सुरु असल्यामुळे अनेक विद्यार्थी पेपरला वेळेवर पोहचू शकले नाहीत. वाहतूक कोंडीमुळे स्कूल व्हॅन वेळेत न पोहचल्याने विद्यार्थांना पालकांच्या दुचाकी गाड्यांवरून मातीच्या रस्त्याने वाट काढत शाळेमध्ये जावे लागले. मात्र पेपरला उशीर झाल्याने त्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागला. कामशेत ते वाकसई चाळ भागातील शेकडो विद्यार्थी शिक्षणाकरिता लोणावळ्यात जात असतात या सर्वांना आजच्या वाहतूक कोंडीचा व आयआरबी कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका सहन करावा लागला. सकाळी काहीवेळ लहान वाहनां करिता काही लेन मोकळ्या केल्यानंतर नऊ सव्वानऊ दरम्यान वाहतूक कोंडी नियंत्रणात आली. फास्ट टॅग करिता असणारा डाटा अचानक सर्व वाहनांचा ब्लॅकलिस्ट दाखवू लागल्यामुळे वाहनांचे स्कॅनिंग होत नव्हते.
हेही वाचा >>> पुणे: हडपसरमध्ये लॉजमधील वेश्याव्यवसाय उघड ; पाच महिला ताब्यात; लॉज चालकावर गुन्हा
सर्व यंत्रणा ही निर्माण झालेली समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र समस्या सुटत नव्हती. दरम्यान फॅस्ट टॅग स्कॅनिंग होत नसल्याने काही वाहन चालकांकडून रोख रक्कम घेऊन तर काही वाहने थांबून ठेवून टोल वसुली मध्यरात्रीपासून सुरू होती. यामुळे सकाळी दिवस उजडत पर्यत आठ ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा गेल्या. शाळकरी मुले अडकून पडली, स्कूल व्हॅन अडकून पडल्या, कामगार, दुग्ध व्यवसायिक हे सर्वजण यामुळे हैराण झालेले असताना आयआरबी कंपनी व त्यांचे कर्मचारी वाहन चालकांची अडवणूक करत टोल वसुली करण्यात मग्न होते. तर एवढी वाहतूक कोंडी होऊन देखील ती सोडविण्यासाठी अथवा काहीतरी मध्यमार्ग काढण्यासाठी महामार्ग पोलीस किंवा लोणावळा ग्रामीण पोलीस यांच्यापैकी कोणाची या परिसरात उपस्थिती नव्हती. भविष्यात असे प्रसंग निर्माण होऊ नयेत याकरिता किमान सकाळच्या सत्रामध्ये वरसोली टोलनाक्यावर एक लेन ही स्थानिक कामगार, दुग्ध व्यवसायिक व शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी मोकळी ठेवावी अशी मागणी या परिसरातील नागरिक व शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहन चालक-मालक व पालक यांनी केली आहे.