मानवता हेच श्रेष्ठ व शुद्ध साहित्य असून, माणुसकीच्या पदापुढे सर्व पदे फिकी आहेत, असे विचार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. रावसाहेब शिंदे यांनी व्यक्त केले.
कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या माजी उपाध्यक्ष विजय कोलते यांचे जीवनचरित्र असलेल्या ‘या सुंदर पाऊलवाटा’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन शनिवारी शिंदे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम, माजी आमदार उल्हास पवार, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य अजित चंदेले, उत्कर्ष प्रकाशनचे सु. वा. जोशी तसेच तानाजी कोलते आदी या वेळी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, की माणसाच्या जवळ जाऊन त्याचे जीवन पाहण्याची प्रवृत्ती आपल्याकडे कमी आहे. माणसे गेली की त्यांचे कौतुक केले जाते, असे होऊ नये. मानवतेमध्ये सर्व काही सामावलेले आहे. तेच शुद्ध व श्रेष्ठ साहित्य असते. पाऊलवाटा या पुस्तकामधून जीवनाची वाटचाल कशी करायची व त्यातून प्रगती कशी साधायची हे कळते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पुढे चालण्याचा धडा या पुस्तकात आहे.
कदम यांनी कोलते यांच्या आजवरच्या कामाचे कौतुक केले. पुस्तकाबाबत ते म्हणाले, की कोलते यांचा जीवनप्रवास असलेल्या या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितच इतरांना प्रेरणा मिळू शकणार आहे.
पवार म्हणाले, की जीवनात खाचखळगे आले, तर त्यावर कशी मात करावी, हे शिकवणारी ही पाऊलवाट आहे.
विजय कोलते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्याचे स्वागत केले.