पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात वैद्यकीय आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास उपचार करण्यासाठी ‘कोड ब्ल्यू’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये सर्वप्रथम ससूनमध्ये ही यंत्रणा सुरू झाली. या यंत्रणेमुळे वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत केवळ १२० सेकंदांत रुग्णाला उपचार मिळत असून, मागील सहा महिन्यांत सुमारे पाचशे रुग्णांचे प्राण वाचले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ससूनमध्ये ‘कोड ब्ल्यू’ची सुरुवात जुलैमध्ये झाली. रुग्णालयात आतापर्यंत सहा महिन्यांत ७८८ वेळा यंत्रणेचा वापर झाला. त्यामधील ४९४ म्हणजेच सुमारे ६३ टक्के रुग्ण वाचविण्यात यश आले. वाचलेल्या रुग्णांपैकी २२ टक्के रुग्ण हृदय पूर्णपणे बंद झालेले होते. या रुग्णांना तातडीचे उपचार करून वाचवण्यात आले. तातडीचे उपचार करूनही मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २८१ आहे, अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.

हेही वाचा – साडेचार लाख कोटींच्या घरविक्रीचा अंदाज; देशातील सात प्रमुख महानगरांबाबत ‘अनारॉक’चा आशावाद

ससून रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज सुमारे तीन हजार रुग्ण येतात. त्यांच्यासमवेत त्यांचे नातेवाईक असतात. याचबरोबर रुग्णालयात दाखल रुग्ण आणि त्यांचेही नातेवाईक असतात. एखाद्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यास अथवा श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यास तातडीने उपचार करण्याची परिस्थिती उद्भवते. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यास पहिले दहा मिनिटे हा सुवर्ण काळ मानला जातो. त्या कालावधीत उपचार झाल्यास रुग्ण वाचण्याची शक्यता जास्त असते. हाच विचार करून ससूनमध्ये ‘कोड ब्ल्यू’ यंत्रणा सुरू झाली.

या यंत्रणेसाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून, ते २४ तास उपलब्ध आहे. या पथकात डॉक्टर, भूलरोग तज्ज्ञ, औषधशास्त्र तज्ज्ञ, परिचारिका आणि परिचरांचा समावेश आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण जाधव हे ‘कोड ब्ल्यू’चे मुख्य समन्वयक आहेत. या पथकात डॉ. रोहिदास बोरसे, डॉ. एच. बी. प्रसाद, डॉ. संयोगिता नाईक, डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. राजेश्वरी वोहरा, अधिसेविका विमल केदार, शीला चव्हाण, कोड ब्ल्यू समन्वयक गौरव महापुरे यांचा समावेश आहे.

हेही वाचा – पुणे मेट्रो पुढे सरकेना! विस्तारित मार्गात अडचणींची मालिका

‘कोड ब्ल्यू’ कशाप्रकारे काम करते…

रुग्णालयात वैद्यकीय आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास त्याची उद्घोषणा ध्वनिक्षेपक यंत्रणेद्वारे केली जाते. याचबरोबर रुग्णालयातील कोणत्याही विभागातून सात क्रमांक डायल करून ‘कोड ब्ल्यू’ पथकाला पाचारण करता येते. हे पथक १२० सेंकदांच्या आत संबंधित रुग्णाकडे धाव घेऊन त्याच्यावर तातडीचे उपचार करते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hundreds of lives were saved due to code blue five hundred patients were saved in last six months in sassoon pune print news stj 05 ssb