सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि पादचारी तसेच वाहनचालकांच्या अन्य प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी भारतीय जनता पक्षातर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. पर्यायी रस्त्यांचे काम तातडीने सुरू न झाल्यास आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
सिंहगड रस्त्यावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन पर्यायी रस्त्यांच्या मागणीसाठी आमदार मिसाळ यांनी गेली तीन वर्षे पाठपुरावा केला आहे. मात्र, महापालिकेकडून अद्याप कोणतीही कामे सुरू करण्यात आलेली नाहीत. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हिंगणे खुर्द चौकात मिसाळ यांच्यासह पक्षाचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे, आमदार गिरीश बापट, भीमराव तापकीर, गटनेता अशोक येनपुरे, स्थानिक नगरसेवक श्रीकांत जगताप, मंजुषा नागपुरे, तसेच श्रीनाथ भिमाले, धनंजय जाधव, प्रतिभा ढमाले, मानसी देशपांडे, मनीषा चोरबेले, स्मिता वस्ते, पर्वती मतदारसंघाचे अध्यक्ष विश्वास ननावरे, मंजुश्री खर्डेकर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
अस्तित्वातील रस्तांचे रूंदीकरण, पर्यायी रस्ते विकसित करणे, नदीकाठ तसेच कालव्याशेजारील रस्ते विकसित करणे, आवश्यक तेथे उड्डाणपूल, विकास आराखडय़ातील रस्त्यांचा विकास आदी उपाययोजनांद्वारे सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होऊ शकतो. त्यासाठी फनटाईम वडगाव बुद्रक ते पु. ल. देशपांडे उद्यान, वडगाव बुद्रुक चौक ते तुकाईनगर, महादेवनगर ते राजीव गांधी वसाहत, जनता वसाहत ते नीलायम चित्रपटगृह, सातारा रस्ता ते हिंगणे खुर्द हा बोगदा मार्ग, सनसिटी ते राजाराम पूल तसेच राजाराम पूल ते भिडे पुलापर्यंत नदीपात्रालगतचा रस्ता, राजाराम पूल ते वडगाव बुद्रुक उड्डाण पूल हे पर्यायी मार्ग विकसित होण्याची गरज असून त्यासाठी आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी झालेल्या सभेत देण्यात आला.

Story img Loader