पुणे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. शहरातील विविध रस्त्यांवर रात्री उशिरांपर्यंत वाहनांची गर्दी असते. या पाश्र्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या चौकात रात्री उशिरापर्यंत वाहतूक नियमन करणारे सिग्नल सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असला आणि रात्री उशिरापर्यंत वाहतूक नियमनासाठी वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई तैनात करण्यात आले असले, तरी अंधार पडताच वाहनचालकांकडून वाहतुकीचे नियम सर्रास तोडले जात असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.
पुणे शहरातील फग्र्युसन रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता, गणेशखिंड रस्ता, कोरेगाव पार्क, नगर रस्ता, मुंबई-बंगळुरु बाह्य़वळण मार्ग, सिंहगड रस्ता यांसह विविध प्रमुख रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत वाहनांची गर्दी असते. रात्री उशिरापर्यंत हे रस्ते गजबजलेले असतात. अंधार पडल्यानंतर वाहने भरधाव चालवण्याची वाहनचालकांची मानसिकता असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी गंभीर स्वरूपाचे अपघात होतात. दिवसा वाहतुकीचे नियम तोडण्यास वाहनचालक कचरतात. वाहतूक पोलीस पकडण्याची भीती वाटत असल्याने वाहनचालकांकडून दिवसा वाहतुकीचे नियम तोडले जात नाहीत. मात्र, रात्री कारवाई होत नसल्याने वाहनचालक सर्रास वाहतुकीचे नियम मोडतात, असे निरीक्षण वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना नोंदविले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाच्या २८ चौकांमधील वाहतूक नियंत्रक दिवे (सिग्नल) रात्री अकरापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत प्रमुख चौकांतील सिग्नल्स सुरू ठेवण्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत वाहनांची गर्दी असते. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कामाच्या वेळा वाढविण्यात आल्या आहेत. प्रमुख चौकांमध्ये रात्री अकरा वाजेपर्यंत वाहतूक शाखेचा एक पोलीस शिपाई नियमनासाठी तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही आवाड यांनी सांगितले.
दिवसा वाहतुकीचे नियम पाळणारे वाहनचालक रात्री नियम पाळण्यास फारसे उत्सुक नसतात. त्यामुळे रात्री वाहतुकीचे नियम तोडण्यासाठी असतात, अशी वाहनचालकांची मानसिकता असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलीस नियमनासाठी तैनात करणे पोलिसांना शक्य नाही. मात्र वाहतूक पोलीस नसल्याची संधी साधून भरधाव वाहने चालविल्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात होतात. भरधाव वेगामुळे सर्वाधिक अपघात किवळे ते कात्रज बोगदा (बाह्य़वळण मार्ग) दरम्यान झाले आहेत.

पुणे शहरात मोठय़ा संख्येने माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे तरुण आहेत. शनिवार आणि रविवार सलग सुट्टय़ा असल्याने शुक्रवारी सायंकाळनंतर प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी सुरू होते. मद्य पिऊन वाहने चालविल्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात होतात. मद्य पिऊन वाहने चालविणाऱ्या पाच हजार आठशे वाहनचालकांविरुद्ध गेल्या वर्षी वाहतूक शाखेने कारवाई केली होती.
सारंग आवाड, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hurry breaking signal darkness traffic rules