पुणे : कौटुंबिक वादातून महिलेवर चाकूने वार करुन पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बाणेर भागात घडली. या घटनेत महिलेसह तिचा पती गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नसीमा मुल्ला (वय ३२), अमजद युसुफ मुल्ला (वय ३९, रा. चेंबूर, विष्णूनगर, मुंबई) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत गणेश कचरु लंके (वय ३६, रा. ग्रॅव्हेंटाइन हाॅटेल, ज्युपिटर हाॅस्पिटलशेजारी, बाणेर) यांनी चतु:शृंगी (बाणेर) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमजद मुल्ला टेम्पोचालक आहे. त्याचे पत्नी नसीमा हिच्याशी कौटुंबिक कारणावरुन वाद व्हायचे. नसीमाचे नातेवाईक बाणेर भागात राहायला आहेत. नसीामा आणि अमजद नातेवाईकांना भेटायला पुण्यात आले होते. बाणेर भागातील एका हाॅटेलमध्ये ते उतरले होते. सोमवारी (१३ जानेवारी) सकाळी दोघांमध्ये हाॅटेलच्या खोलीत वाद झाले.
हेही वाचा >>>पुण्यातून ‘अमृत भारत एक्स्प्रेस’ उत्तर भारतातील चार मार्गांवर सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू
त्यानंतर अमजदने पत्नी नसीमावर चाकूने वार केले. अमजदने स्वत:च्या गळ्यावर, तसेच पोटावर चाकूने वार केले. दोघे जण गंभीर जखमी झाले. हाॅटेलमधील खोलीत सुरू असलेला आरडाओरडा ऐकून कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली. जखमी अवस्थेतील मुल्ला दाम्पत्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासात अमजदने कौटुंबिक वादातून पत्नीवर चाकूने वार केल्याची माहिती मिळाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण तपास करत आहेत.