नारायणगाव : गर्भवती असलेल्या २३ वर्षीय पत्नीचा डोळ्यासमोरच अपघाती मृत्यू झाल्याच्या मानसिक धक्क्यातून पतीने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना जुन्नर तालुक्यात गुरुवारी घडली. रमेश नवनाथ कानसकर (वय २९, रा. धोंडकरवाडी निमदरी, ता. जुन्नर) यांनी आत्महत्या केली आहे. १४ नोव्हेंबरला वारूळवाडी येथील मुख्य रस्त्यावर दूध डेअरीसमोर ट्रॅक्टर ट्रॉलीचा धक्का लागून रमेश कानसकर यांची पत्नी विद्या कानसकर (वय २३) यांचा मृत्यू झाला. या दिवशी विद्याची आई विमल जाधव यांच्यासह रमेश आणि विद्या नारायणगाव येथे सोन्याचे दागिने खरेदीसाठी आले होते. खरेदीनंतर दुचाकीवरून घरी जात असताना दूध डेअरीसमोर गतिरोधकामुळे विद्या दुचाकीवरून खाली उतरली. त्याच वेळेला समोरून एक ट्रॅक्टर उसाने भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन येत होता. त्यातील एकाचा धक्का विद्याला लागल्याने ती खाली कोसळली आणि चाकाखाली सापडून तिचा मृत्यू झाला.
विद्याचा पतीसमोरच जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे याचा प्रचंड धक्का बसला. या अपघाताला मीच जबाबदार असल्याचे समजून रमेश हे गेल्या तीन दिवसांपासून मानसिक तणावामध्ये होते. त्याच स्थितीत त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. पहाटेच्या सुमारास त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. रमेश यांना सुरुवातीला जुन्नर येतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याची स्थिती बिघडल्याने नारायणगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले. मात्र, दरम्यानच्या काळात त्यांचा मृत्यू झाला.
आठ महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह
रमेश कानसकर आणि विद्या यांचा प्रेमविवाह झाला होता. विवाहापूर्वी तिच्या शिक्षणाचा काही खर्च रमेश यांनी केला होता. विद्याला आईशिवाय कोणीही नव्हते. त्यामुळे विद्यासह तिच्या आईचीही रमेश काळजी घेत होता. आठ महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. विद्या एक महिन्याची गर्भवती होती. अशा स्थितीत पत्नीच्या अपघाती मृत्यूचा धक्का रमेश यांनी घेतला होता. रमेश यांच्या मागे आई-वडील, एक भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.