पुणे : गर्भवती पत्नीला पतीने बेदम मारहाण करून तिच्या पोटावर लाथ मारल्याने गर्भपात झाला. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी पतीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुनील विनायक धारक (रा. शिंदवणे, लाेणी काळभोर) असे गुन्हा दाखल केलेल्या पतीचे नाव आहे.
याबाबत २३ वर्षीय पत्नीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धारक याची पत्नी गर्भवती आहे. कौटुंबिक कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. सुनीलने पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. सुनीलने तिच्या पोटात लाथ मारली. मारहाणीत गर्भपात झाला. पत्नीने पोलिसांकडे तक्रार दिली. पत्नीला बेदम मारहाण करून गर्भपातास जबाबदार ठरल्याने पोलिसांनी आरोपी सुनीलच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक धायगुडे तपास करत आहेत.