चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा कुऱ्हाडीने खून करून तिचे शिर वेगळे करून ते रस्त्यावरून घेऊन निघालेल्या एका नराधमाला पुणे पोलीसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली. अंगावर काटा येणाऱ्या या घटनेमुळे कात्रज परिसरात काहीवेळ घबराटीचे वातावरण पसरले होते.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरातील ‘गंगा ओशन’ सहकारी गृहरचना संस्थेमध्ये देखरेखीचे काम करणाऱया रामू चव्हाण (वय ५३) याने चारित्र्याच्या संशयावरून शुक्रवारी आपली पत्नी सोनूबाई चव्हाण हिचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. त्याने पत्नीचे शिर धडापासून वेगळे केले आणि ते घेऊन तो रस्त्याने निघाला. यानंतर रस्त्यावरील लोकांनी याबद्दल वाहतूक पोलीसांना माहिती दिल्यावर त्यांनी त्याच्याकडे त्याबद्दल विचारणा केली आणि त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. यानंतर लगेचच वाहतूक पोलीसांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानंतर रामू चव्हाण याला अटक करण्यात आली.
पत्नीच्या शरीराचे तुकडे घटनास्थळावरून पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband kills his wife walking with her head in katraj area