पुणे : पोटगीची रक्कम थकविल्याने न्यायालयाने पतीची एका महिन्यासाठी कारागृहात रवानगी करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. बडवे यांनी दिली.याबाबत एका महिलेने ९ मार्च २०२१ रोजी कौटुंबिक हिंसाचार प्रकरणीन्यायालयात अर्ज दाखल केला होता. या खटल्यात तिचा पती हजर न झाल्यामुळे त्याच्या विरोधात न्यायालयाने २३ जुलै २०२३ रोजी एकतर्फी आदेश दिला होता. त्यानुसार न्यायालयाने पत्नीला उदरनिर्वाहासाठी १५ हजार रुपये, मुलाला पाच हजार रुपये, तसेच घर भाड्यापोटी पाच हजार रुपये असे एकूण मिळून २५ हजार रुपये दरमहा पोटगी देण्याबाबत अंतरिम आदेश दिले होते. नुकसान भरपाईपोटी ४० हजार, तसेच दाव्याच्या खर्चापोटी पाच हजार रुपये पत्नीला देण्याचे आदेशात नमूद करण्यात आले होते.

मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतरही पतीने पोटगीची रक्कम भरली नाही. त्याने पोटगीचे सात लाख ९५ हजार रुपये थकविले होते त्यामुळे पत्नीने वकिलांमार्फत न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होण्यासाठी अर्ज दाखल केला होता. पतीने न्यायालयाची दिशाभूल करून पत्नी आणि मुलाला वाऱ्यावर सोडले असल्याचे वकिलांनी युक्तिवादात सांगतिले. पोटगीची रक्कम न भरून पत्नीला त्रास व्हावा, या उद्देशाने पतीने न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर केला आहे. पत्नी आणि मुलाची देखभाल करणे हे कर्तव्य आहे. पैसे भरत नसल्याने त्याची रवानगी दरखास्तीच्या प्रक्रियेनुसार न्यायालयीन कोठडीत करण्यात यावी, असा युक्तिवाद पत्नीच्या वकिलांनी केला. न्यायालायने युक्तिवाद ग्राह्य धरुन एक महिन्यासाठी पतीची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.

Story img Loader